अभिनय जितका प्रामाणिकपणे कराल, तितका तो उत्तम होईल – अभिनेता आमिर खान

मुंबई, दि. 4 :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल असल्याचे सांगून ‘अभिनयाची कला’ या विषयावरील त्यांच्या अतिशय सहजसोप्या आणि उपयुक्त सल्ल्यांनी अभिनेता आमिर खान यांनी वेव्हज 2025 मध्ये अनेकांची मने जिंकली.

आमिर खान पुढे म्हणाले की, मी प्रशिक्षित अभिनेता नाही. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जाण्याची माझी इच्छा होती, पण जमलं नाही. मी माझ्या वाटचालीत या लहान-लहान गोष्टी शिकलो, ज्या माझ्यासाठी उपयोगी ठरल्या.

चित्रपट निर्मितीच्या भविष्याबद्दल बोलताना, आमिर खान म्हणाले की, एआय तंत्रज्ञानामुळे आता अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे! एआय आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने नंतर दृश्यात अभिनेत्याला जोडले जाऊ शकते.

एखाद्या अभिनेत्यासाठी सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे त्या पात्राच्या मनात प्रवेश करणे,  असे या अष्टपैलू अभिनेत्याने सांगितले,  ज्यांनी गेल्या अनेक वर्षांत साकारलेल्या अनेक अविस्मरणीय भूमिकांची भारतीय सिनेमाला भेट दिली आहे. आणि  त्या भूमिकेच्या अंतरंगात ते कशा प्रकारे सामावून जातात? त्यावर या सिनेक्षेत्राला वाहून घेतलेल्या अभिनेत्याचे उत्तर आहे, “मी स्क्रिप्टसोबत खूप वेळ घालवतो. मी पटकथा पुन्हा पुन्हा वाचतो. जर पटकथा चांगली असेल, तर तुम्हाला त्या पात्राची समज येईल, त्याचे भौतिक स्वरुप, वृत्ती इत्यादी सर्व काही त्यातूनच येईल”. याव्यतिरिक्त, दिग्दर्शकाशी पात्राबद्दल आणि कथेबद्दल चर्चा केल्याने देखील कल्पना येते.

अतिशय परिश्रम करण्याच्या आपल्या वृत्तीविषयी स्पष्टीकरण देताना आमिर खान यांनी सांगितले, “माझी स्मरणशक्ती कमी आहे. त्यामुळे मी हाताने संवाद लिहितो. सर्वात आधी मी अवघड दृश्ये करायला घेतो. संवादांचे पाठांतर झालेच पाहिजे. पहिल्या दिवशी मी केवळ त्यावर काम करतो, तीन ते चार महिने मी दररोज तेच करत राहतो आणि मग त्यामध्ये शिरतो. संवाद हे तुमच्यामध्ये सामावले पाहिजेत. ते तुमचे स्वतःचे वाटले पाहिजेत. ज्यावेळी ते लिहिले गेले तेव्हा ते पटकथाकाराचे होते. पण नंतर ते तुमचे झाले आहेत. ज्यावेळी तुम्ही एक ओळ पुन्हा पुन्हा उच्चारता, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की हे तुम्ही अनेक प्रकारे करू शकता.

कलाकारांसाठी सर्वात कठीण काम कोणते असते? त्यावर आमिर खान म्हणाले, की कलाकाराला दररोज पुन्हा पुन्हा त्याच उत्कटतेने भावनिक अभिनय सादर करावा लागणे.

नवोदित कलाकारांसाठी आमिर खान यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे – “तुमचे काम तुम्ही जितके प्रामाणिकपणे कराल, तितके ते उत्तम होईल”.

तर, मग खुद्द आमिर खान त्यांच्या दृश्यांचा सराव कसा करतात?

याचे उत्तर असे, की “मी शॉट्स देण्यापूर्वी त्या दृश्याची कल्पना करतो आणि त्या दृश्यांचा सराव करत असताना मी कधीच आरशात पाहत नाही.”

आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपैकी आमिर खान यांचा आवडता चित्रपट कोणता? अनेकांनी अंदाज लावलाच असेल, की तो चित्रपट ‘तारे जमीन पर’ असावा. तर होय, कारण या चित्रपटाने अनेक पालकांना त्यांच्या मुलांशी संयमाने वागायला, त्यांना प्रसंगी आधार द्यायला आणि त्यांच्या लहान मुलांशी सहानुभूतीपूर्वक वागायला शिकवले!

अभिनय क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या नवोदितांसाठी या ज्येष्ठ अभिनेत्याकडे आणखी कोणत्या टिप्स आहेत?

“भावना या पटकथेतूनच समोर येतात. तुमचा पटकथेवर विश्वास असावा लागतो. कधीकधी चित्रपटांमध्ये अशी काही दृश्ये असतात, जी अविश्वसनीय वाटतात. पण अभिनेता तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतो. त्यामुळे अभिनेत्याला प्रेक्षकांना पडद्यावर दाखवली जाणारी गोष्ट पटवून सांगावी लागते”.

चांगली पटकथा म्हणजे काय असते? आमिर खान यांनी उत्तरात सांगितले, की “चांगल्या पटकथेला उत्तम संकल्पनेचा आधार असावा लागतो. कथेच्या पहिल्या दहा टक्के भागात कथानकाचे ध्येय निश्चित झाले पाहिजे. नाहीतर प्रेक्षकांचा हिरमोड होईल”.

मात्र, चित्रपटामध्ये सहभागी असलेल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे – “जे त्या दृष्यामध्ये अपेक्षित आहे, ते करा आणि निव्वळ तुमच्या स्वतःच्या कामापुरता विचार करू नका”.

यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्या हस्ते आमिर खान यांचा सत्कार करण्यात आला.

0000