मुंबई, दि.4 :- जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) छत्राखाली आयोजित केलेल्या या बाजारपेठेत चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅमेशन क्षेत्रात 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक व्यवहार नोंदवले गेले. करार करण्याचे काम अजूनही सुरू असताना, काही दिवसांत एकूण मूल्यांकन 1000 कोटी रुपयांहून जास्त होण्याचा अंदाज आहे.
वेव्हज बाजारामुळे 500 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आणि येत्या काळात अतिरिक्त करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 80-आसन व्यवस्था असलेल्या स्थानी झालेल्या चित्रपटांच्या क्युरेटेड स्क्रीनिंगला उत्साही प्रतिसाद मिळाला आणि निवडक चित्रपटांना दाद मिळाली. बाजाराने उदयोन्मुख निर्मात्यांना त्यांचे आयपी खरेदीदार आणि सहयोगींच्या जागतिक नेटवर्कमध्ये सादर करण्यास मदत केली, ज्यामुळे लक्षणीय औत्सुक्य निर्माण झाले आणि नवीन भागीदारी वाढली.
भारत आणि न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय सहकार्यातील एक मोठी कामगिरी म्हणजे, पेट्रिना डी’रोझारियो यांच्या नेतृत्वाखालील फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅंटरबरी एनझेड यांनी वेव्हजपासून प्रेरित होऊन न्यूझीलंडमध्ये पहिला भारतीय चित्रपट महोत्सव सुरू करण्यासाठी एक सहयोगी प्रस्ताव जाहीर केला. उभय देशांमधील पर्यटन, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सह-निर्मिती संबंध अधिक दृढ करणे हा याचा उद्देश आहे.
प्रमुख करारविषयक घोषणा
प्राइम व्हिडिओ आणि सीजे ईएनएम बहु-वार्षिक सहयोगाची घोषणा ही वेव्हज बझार मधील मुख्य आकर्षण होती. या करारात 240 हून अधिक देशांमधील स्ट्रीमिंगचा समावेश आहे. यामध्ये 28 सबटायटल भाषा आणि 11 डब केलेल्या आवृत्त्या असतील. ‘देवी चौधराणी’, ‘व्हायोलेटेड’ या चित्रपटाच्या लाँचची घोषणा ही वेव्हज बझारचे उद्दिष्ट सिद्ध करणारी आणखी महत्त्वाची घटना होती. प्रभावी पदार्पणासह वेव्हज बझारने केवळ सर्जनशील सहयोगाचे जागतिक केंद्र म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर देशाच्या सीमेपलीकडे जाऊन कथाकथन आणि उद्योग जगतातील परिवर्तनाच्या नवयुगाचा पाया रचला आहे.