उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पडेगाव येथील ‘संपूर्ण वन’ उपक्रमास भेट

छत्रपती संभाजीनगर, दि.०४ (जिमाका): पडेगाव येथे जनसहयोग या संस्थेने विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमास आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. वृक्ष लागवड, संवर्धन करुन जनसहयोग संस्था करीत असलेल्या पर्यावरण संवर्धन कार्याचे पवार यांनी कौतुक केले.

उपमुख्यमंत्री पवार हे आज शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पडेगाव येथील पुण्यश्लोकअहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास  प्रक्षेत्र परिसरात जनसहयोग या संस्थेच्या उपक्रमातून ‘संपुर्ण वन’ही वनवाटीका विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री पवार यांनी आज भेट दिली. यावेळी आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे उपस्थित होते.

समवेत होते. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गिरे यांनी उपक्रमाची माहिती दिली. या प्रक्षेत्रावर २२ हजार वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यात ४०० प्रजातीचे वृक्ष, वनस्पती इत्यादीचा समावेश आहे. या उद्यानामुळे परिसरातील जैवविविधता विकासाला चालना मिळाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. वृक्ष लागवड, वृक्ष देखभाल आदी कामे करणाऱ्या कामगारांशी उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चा केली. याठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र उद्यान, बांबू उद्यान अशा विविध उद्यानांना भेट देऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी पाहणी केली. लागवड झालेल्या वृक्ष प्रजातींची माहितीही त्यांनी करुन घेतली. विविध प्रजातीच्या वनस्पती, फुले, वेली आदी  एकाच क्षेत्रात असल्याने याठिकाणी  संशोधन केंद्र स्थापन करावे,अशी मागणी ही संस्थेच्या वतीने करण्यात आली. संस्थेचे संदीप जगधने, नंदन जाधव, मिलिंद गिरधारी आदी यावेळी उपस्थित होते.

०००