माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार-  राज्‍य माहिती आयुक्त गजानन निमदेव

नागपूर,दि. ०५: गत 34 वर्षापासून पत्रकार ते संपादक म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेले गजानन निमदेव यांनी आज राज्य माहिती आयुक्त (नागपूर खंडपीठ ) पदाची जबाबदारी स्वीकारली. राज्य शासनाने त्यांची नुकतीच या पदावर निवड केली आहे. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करु असे त्यांनी सांगितले. आज दिनांक ५ मे रोजी सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात त्यांनी कामकाजास प्रारंभ केला. कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी व पत्रकार बांधवांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. दैनिक तरुण भारत या मराठी दैनिकात त्यांनी पत्रकार, प्रशिक्षणार्थी उपसंपादक या पदापासून पत्रकारितेला प्रारंभ केला. जवळपास गेली पंधरा वर्षे संपादक म्हणून त्यांनी  दैनिक तरुण भारतची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. नागपुरात काम करणाऱ्या बुलडाणा जिल्हा नागरिक मंडळाचा स्व. शक्तीकुमार संचेती स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांचा आप्पासाहेब पाडळकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार, बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील सत्यजित गौरव पुरस्कार, नागपुरातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार यासह एकूण ७ पुरस्कारांनी निमदेव यांना सन्मानित केले आहे.

सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याची त्यांनी विशेष आवड जपली आहे. याच आवडीतून निमदेव यांनी सातत्याने 20 वर्षे स्तंभलेखन केले. याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी नि:शुल्क मार्गदर्शन केले, हे विशेष. हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. एमपीएससीच्या परीक्षांसाठी सात पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर स्वतंत्रपणे हजारपेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. आठशेपेक्षा जास्त अग्रलेख लिहिले आहेत. इंग्रजी आणि हिंदीतील साडेतीन हजार लेखांचे भाषांतर करण्याचा अनुभव त्यांनी संपादित केलेला आहे.

०००