मुंबई, दि. ०५ : प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, गतिमान आणि कार्यक्षम करण्यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे, असे मत मायक्रोसॉफ्टचे अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
टेक-वारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंत्रालयात ‘शासकीय कामकाज प्रभावीपणे कसे करावे’ या विषयावर मंदार कुलकर्णी बोलत होते.

मंदार कुलकर्णी म्हणाले, गुगल, डॉक्ससारख्या डिजिटल साधनांद्वारे फाईल तयार करणे, ती सुरक्षित जतन करणे आणि थेट ईमेलद्वारे पाठवणे शक्य होते. त्यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण अधिक वेगाने होते आणि वेळेची बचत होते. डिजिटल साधनांचा वापर करून प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ करता येते. मायक्रोसॉफ्ट कोपायलट हा एक एआय-संचालित डिजिटल सहायक असून, तो विविध कार्यालयीन कामकाजात मदतीसाठी डिझाइन करण्यात आला आहे.

डेटा विश्लेषणासाठी पिव्होट टेबल्स सारख्या सुविधांचा वापर करून मोठ्या प्रमाणातील डेटा वर्गवारीनुसार सादर करता येतो. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित करताना श्री. कुलकर्णी म्हणाले, वैयक्तिक माहिती, शासकीय कागदपत्रे किंवा कार्यालयीन डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित बॅकअप व विश्वासार्ह अँटीव्हायरस वापरणे अत्यावश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रश्नोत्तर सत्रात त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
०००
शैलजा पाटील/विसंअ/