‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करा- पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. ०५ (जिमाका):  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत वीज पुरवठा करणारी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून परभणी जिल्ह्यात या योजनेतंर्गत सुरु असणारे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महावितरणचे अधिकारी व प्रकल्प विकासकांना दिले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनेबाबत जिल्ह्यातील स्थितीचा आढावा पालकमंत्री यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, महावितरणचे नांदेडचे मुख्य अभियंता  आर. बी. माने, परभणीचे अधीक्षक अभियंता  आर. के. टेंभुर्णे,  कार्यकारी अभियंता  एम. पी. वग्याणी,  जी. के. गाडेकर, श्री. गिल्लुरकर आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मेडा, महावितरणचे अधिकारी व विकासक उपस्थित होते. तर व्हीसीव्दारे महावितरणचे संचालक (प्रकल्प), महावितरणचे निर्मितीचे (प्रकल्प), कार्यकारी संचालक (सौर/नवीकरणीय ऊर्जा), भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेतंर्गत एकूण 65 उपकेंद्र मंजूर झाले आहेत. यातून सुमारे 255 मे. वॅट सौर वीजनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पांसाठी एक हजार 275 एकर जागा लागणार आहे. 16 उपकेंद्रांना शंभर टक्के जागा मिळाली आहे, तर 26 उपकेंद्रांना अंशत: जमीन मिळालेली आहे. इतर उपकेंद्रांना जमिन मिळण्याची कार्यवाही सुरु आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत परभणी विभागातील गंगाखेड तालुक्यात 9 उपकेंद्र, पालम तालुक्यात 4, परभणी तालुक्यात 15, पुर्णा तालुक्यात 9 आणि सेलू विभागातील जिंतूर तालुक्यात 9, मानवत तालुक्यात 6, पाथरी तालुक्यात 6, सेलू तालुक्यात 3 व सोनपेठ तालुक्यात 4 असे एकूण 65 उपकेंद्रांची संख्या आहे.

पालकमंत्री म्हणाल्या की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0  ही परभणी जिल्ह्यासाठी महत्त्वाची योजना आहे. ही योजना जलदगतीने वेळेत पूर्ण करावी. विकासकांनी महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणाशी समन्वय ठेवावा. कुठलीही अडचण आल्यास संबंधित यंत्रणेशी किंवा माझ्याशी संपर्क साधावा, मात्र योजनेत कुठल्याही प्रकारे दिरंगाई करु नये. प्रशासनाने जमिनीशी संबंधित कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पांचे बहुतांश काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

आढावा बैठकीत पालकमंत्री यांनी कामांची सद्यस्थिती, सोलर विकासकांच्या अडचणी, प्रकल्पासाठी मिळालेल्या जमिनीची माहिती, जमिनी मिळण्यासाठी येत असलेल्या अडचणी याबाबतची माहिती जाणून घेतली. प्रकल्प उभारणीसाठी अडचणींचे तातडीने निराकरण केले जाईल, मात्र विकासकांनी कामे वेळेत पूर्ण करण्याबाबतची सुचना पालकमंत्री यांनी यावेळी केली.  श्री. माने यांनी सादरीकरणाव्दारे योजनेच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा होणार आहे. राज्यात 14 हजार 900 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. यातून 45 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणुक असणाऱ्या या योजनेमुळे 50 हजार रोजगारांची ग्रामीण भागात निर्मिती होणार आहे.

बैठकीत पालकमंत्री यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, सोलार सिटी, सोलार व्हीलेज, शासकीय कार्यालयाच्या छतावर सोलर पॅनल बसविण्याच्या स्थितीचाही आढावा घेतला.

०००