जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणी सोडवू – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

परभणी, दि. ०५ (जिमाका): परभणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योजकांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण केले जाईल, अशी ग्वाही राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील औद्योगिक विकासाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होत्या. बैठकीस भारत सरकारच्या केंद्रीय सुक्ष्म व लघुउद्योग मंत्रलयाचे (बोर्ड सदस्य) प्रदीप पेशकार, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, परभणीचे अधीक्षक अभियंता  आर.के.टेंभुर्णे, जिल्हा उद्योग केंद्र, कौशल्य विकास विभाग, एमसीईडी, जिल्हा लिड बँकेच्या अधिकाऱ्यांसह उद्योग संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी बैठकीत परभणी जिल्ह्यात महामंडळामार्फत परभणी, जिंतूर व गंगाखेड असे तीन औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे, तेथील स्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच परभणी जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणात वाढ करण्याच्या दृष्टीने महामंडळामार्फत एकूण चार ठिकाणी (अति. परभणी टप्पा क्र.1 (मौजे बाभुळगाव व उजळंबा) ता.जि.परभणी, सेलू औद्योगिक क्षेत्र (मौजे-हदगाव खु. पिंप्रुळा व रवळगाव) ता. सेलू, अति. जिंतूर औद्योगिक क्षेत्र (मौजे-कान्हड) ता. सेलू, मौजे पेडगाव-पान्हेरा औद्योगिक क्षेत्र ता.जि.परभणी ) येथे नव्याने औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

परभणी जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी शासनस्तरावर निश्चितपणे प्रयत्न केले जातील, असे सांगून पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, उद्योजकांनीही जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या उद्योगांबाबतच्या योजनांच्या माध्यमातूनही नवीन उद्योजक तयार होणे आवश्यक आहे. यासाठी नियमितपणे बैठका घेऊन उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील. जिल्ह्यात टेक्सटाईल उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उद्योगासाठी लागणाऱ्या मुलभूत सोईसुविधा सक्षम केल्या जातील. उद्योजकांना कसल्याही प्रकारे अडचण भासू दिली जाणार नाही.

पेशकार म्हणाले की, परभणीचा औद्योगिक विकास व जीडीपी वाढवायचा असेल तर उद्योजकांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य पध्दतीने नियोजन करणे गरजेचे आहे. यावेळी पालकमंत्री यांनी उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण प्राधान्याने करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

०००