अहिल्यानगर, दि. ६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे १०२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या आणि पोलीसांसाठी ३२० नवीन निवासस्थाने असलेल्या वसाहतीचे, तसेच राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नव्याने उभारण्यात येणारी पोलीस वसाहत व राज्य राखीव पोलीस निरीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती विषयी माहिती जाणून घेतली.
पोलिसांसाठी आवश्यक सुविधायुक्त वसाहत उभी राहणार
पोलीस वसाहतीच्या नवीन इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर आठ निवासस्थाने याप्रमाणे ८० निवासस्थाने असून अशा एकूण चार इमारती उभारण्यात येत आहेत. पोलीस अंमलदार निवासस्थानामध्ये दोन बेडरुम, हॉल, किचन असा ५० चौ.मी क्षेत्रफळ आहे. पार्किंगमध्ये सर्वत्र सोलरद्वारे विद्युत पुरवठा असून अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, सांडपाणी शुद्धीकरण व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.
अशी आहे नवीन प्रशासकीय इमारत
नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीमध्ये शस्त्रागार, राखीव पोलीस निरीक्षक कार्यालय, टेंट हाऊस, क्रीडा साहित्य कक्ष, बँड रुम, बेल ऑफ आर्मस् आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.