मुंबई, दि. ६ : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी दिनांक ७ मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक सिक्युरिटी ड्रिल राबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १६ ठिकाणी सिक्युरिटी ड्रिल घेण्यात येणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत देशभरातील २४४ जिल्हा नागरी संरक्षण केंद्रांची स्थिती तपासण्यात आली. यामध्ये निवारा केंद्रे, इशारा देणारी यंत्रणा आणि समन्वय सुविधा कार्यरत आहेत की दुरुस्तीची गरज आहे, याचे मूल्यमापन करण्यात आले. या ड्रिलचा महत्त्वाचा भाग म्हणजे सामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे असणार आहे.
गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरन आणि ब्लॅकआऊट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना त्यांच्या घरी वैद्यकीय कीट, अतिरिक्त औषधे, टॉर्च आणि मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार
प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की, अशा परिस्थितीत मोबाईल उपकरणे आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक ती रोख रक्कम जवळ ठेवावी. गृह मंत्रालयाने देशभरातील २४४ जिल्ह्यांमध्ये १०० हून अधिक संवेदनशील ठिकाणांची निश्चिती केली आहे. या मॉक ड्रिलमध्ये अनेक उपाययोजना समाविष्ट असणार आहेत. त्यामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवणे, नागरिकांना नागरी संरक्षणाच्या उपाययोजनांचे प्रशिक्षण देणे, शत्रूच्या संभाव्य हल्ल्याच्या वेळी स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करणे, तसेच बंकर आणि खंदकांची स्वच्छता व तपासणी करणे यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हायअलर्ट जारी केला आहे. राज्य प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून, सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना संबंधित प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत. उद्या राज्यातील १६ ठिकाणी मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट होणार आहे.
महाराष्ट्रात १६ ठिकाणी मॉकड्रिल
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
0000
नीलेश तायडे/विसंअ/