सोलापूर, दि. ०७: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कांदलगाव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी 14 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच बार्शी शहरातील श्री भगवंत मंदिराच्या भक्तनिवासाचे भुमिपूजन करून तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी 286 कोटीचा निधी मंजूर करण्याचा संकल्प पालकमंत्री गोरे यांनी केला.
कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर अभियंता विवेक देशमुख आणि संबंधित विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
उपसा सिंचन योजनेचे आश्वासन
पालकमंत्री गोरे यांनी लवकरच उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे आश्वासन दिले. कांदलगावमधील नरसिंह मंदिरालाही तीर्थक्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांसाठी सुविधा
पालकमंत्री गोरे यांनी सांगितले की, विठुरायाच्या पालखीची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. वारकऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा कमी पडू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे बार्शी तालुक्यातील विकासकामांमध्ये गती येईल आणि स्थानिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
०००