मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही धोकेही आहेत. काही वेळा हे तंत्रज्ञान आपल्याला वास्तवापासून दूर नेते, ज्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधत आहोत, त्यापासून आपले लक्ष विचलित करते. त्यामुळे, या वापरासोबतच आपण त्याचे धोके ओळखणे आणि त्याबाबत सजग राहणे आवश्यक आहे, असे मत एलटीआय माईंडट्री कंपनीचे सह उपाध्यक्ष मनीष पोतदार यांनी व्यक्त केले.
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” मंत्रालयात आयोजित करण्यात आला आहे. त्या अंतर्गत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची आधुनिक तंत्रज्ञानामध्ये क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एलटीआय माईंडट्री कंपनीचे सह उपाध्यक्ष आदीश आपटे यांनीही मार्गदर्शन केले.
भारताच्या संभाव्य क्षमतेकडे लक्ष वेधताना श्री. पोतदार म्हणाले, आज भारत जगातील सर्वात तरुण लोकसंख्येसह एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहे. देशात प्रचंड प्रमाणात कुशल मनुष्यबळ आहे, डेटा आहे, आणि आधुनिकतेकडे वाटचाल करण्याची ठाम इच्छा आहे. म्हणूनच, भारत आणि विशेषतः महाराष्ट्र हे डेटा व डिजिटल क्षेत्रात आघाडी घेत आहे.
भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात जागतिक स्तरावर आपले स्थान प्रस्थापित करत आहे. डिजिटल युगात भारताच्या नेतृत्वाकडे आशेने पाहत आहे. ‘ग्लोबल कोलॅबोरेशन अँड गव्हर्नन्स’ ही भारताची महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील एआय धोरण हे केवळ स्थानिक गरजांसाठी नव्हे, तर जागतिक शाश्वत विकासासाठी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साठी भारताने कौशल्य विकासावर भर दिला आहे. 3.1 दशलक्ष सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून, उद्योगासाठी इनोव्हेटिव्ह फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. “एआय फॉर ऑल” या दृष्टीने, भारत ‘एआय’ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे श्री. पोतदार यांनी सांगितले.

मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा
भारत सध्या जगातील सर्वात मोठ्या डिजिटल ओळखीच्या प्रणालीचा वापर करत आहे. १.४ अब्ज नागरिकांचे आधार कार्ड, दररोज ८९ मिलियन बायोमेट्रिक ओळखीचे व्यवहार, आणि दरमहा ४० अब्ज यूपीआय व्यवहार हेच सांगतात की, भारत डेटा एक्सचेंज, ओळख व्यवस्थापन आणि डिजिटल व्यवहारांमध्ये अग्रेसर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेत सहा आधारस्तंभ आहेत. त्यातील चौथा स्तंभ म्हणजे डिजिटल परिवर्तन आहे. ज्यात एआयचा महत्त्वाचा वाटा आहे. आज आपण या चौथ्या स्तंभाच्या विकासाचे साक्षीदार आहोत. आपला देश स्वतःला “एआय युज कॅपिटल” म्हणून उभे करत आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, शासन, आणि उद्योजकता क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा(एआय) वापर करून एक प्रगत, समावेशक आणि सक्षम भारत घडवण्याचा संकल्प केला जात आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
००००
गजानन पाटील/स.सं