मुंबई, दि. ९ : “माऊली… माऊली…” च्या जय घोषात, टाळ-मृदंगाच्या नादात आणि हरिभक्तीच्या भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात मंत्रालयात पार पडलेल्या “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” या अनोख्या उपक्रमाचा सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप झाला.
यावेळी अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी, महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला, संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संध्या पुरेचा आदी उपस्थित होते. राज्याचे प्रशासनातील मनुष्यबळ अधिक तंत्र कुशल, गतिमान होण्यासाठी मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी 5 ते 9 मे दरम्यान सामान्य प्रशासन विभागामार्फत टेक वारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अपर मुख्य सचिव वेणू गोपाल रेड्डी म्हणाले, सद्यस्थितीत तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते. प्रशासकीय कामकाजात अचूकता आणि गतीमानता आणण्याबरोबरच कार्यप्रणालीत परिणामकारकता वाढविणे, तसेच कामाच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘टेक वारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त आर. विमला म्हणाल्या, भविष्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि संवेदनशील करण्याच्या दृष्टीने ‘टेक वारी’ उपक्रम हा महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमातून केवळ नवतंत्रज्ञानाची ओळख नव्हे, तर मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा मार्ग उघडण्यात आला आहे.
डॉ. संध्या पुरेचा म्हणाल्या, तंत्रज्ञानाचा स्वीकार जितका आवश्यक आहे, तितकेच संस्कृतीचे संवर्धनही महत्त्वाचे आहे. मातृभाषा, कला आणि परंपरेच जतन करा, ‘टेक वारी’ उपक्रमातून याच संतुलनाचा संदेश देण्यात आला आहे.
‘टेक वारी’ उपक्रमात प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या विविध विषयांवर तज्ज्ञांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ‘ब्लॉकचेन’, ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘सायबर सुरक्षा’, ‘डिजिटल फायनान्स’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर टेक’ यासारख्या आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर आधारित सत्रांमधून सहभागी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना समृद्ध माहिती मिळाली. या तांत्रिक विषयांचे सुलभ व समजण्यायोग्य पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपल्या सादरीकरणातून प्रशासनाच्या कार्यपद्धतीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता येईल, याची दिशा दाखवली आहे.
००००
शैलजा पाटील/विसंअ