लष्कराचा सन्मान आणि आभार व्यक्त करण्यासाठी तिरंगा रॅली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे. या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान येथे तिरंगा रॅली पार पडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे. पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले. भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्यूत्तर भारताने दिले आहे.

रॅलीच्या प्रांरभी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू झालेली रॅली गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आली. समारोपावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थितांनी शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण केले आणि टिळक स्मारकास अभिवादन केले.

या रॅलीमध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्यासह मुंबईतील आमदार, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/