बिहार, हरियाणा आणि दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई, दि. १४ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहार, हरियाणा आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCT) दिल्ली येथील क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसाठी विशेष  प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांच्या हस्ते या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), नवी दिल्ली येथे झाले.

या कार्यक्रमात एकूण ३७१ क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले असून त्यामध्ये बिहारमधील ३०६ बूथ स्तर अधिकारी (BLOs), हरियाणाचे ३० आणि दिल्लीतील ३५ मतदार नोंदणी अधिकारी व बीएलओ पर्यवेक्षकांचा समावेश आहे. मागील दोन महिन्यांत दिल्लीतील प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण २,६०० हून अधिक अधिकारी सहभागी झाले.

उद्घाटनप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, बूथ स्तर अधिकाऱ्यांना लवकरच ओळखपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत, जे त्यांना घरोघरी जाऊन पडताळणी करताना उपयुक्त ठरणार आहेत. त्यांनी सहभागी अधिकाऱ्यांना त्यांच्या राज्यांतील इतर बीएलओ अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याचेही निर्देश दिले. तसेच, हे काम लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०; मतदार नोंदणी नियम, १९६०; निवडणूक आचार नियमावली, १९६१ आणि आयोगाच्या सूचनांनुसारच व्हावे, असेही त्यांनी बजावले.

प्रशिक्षणात मतदार नोंदणी, विविध फॉर्म्सची प्रक्रिया आणि निवडणूक प्रक्रियेचे क्षेत्रीय पातळीवरील अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत आहे. सहभागी अधिकाऱ्यांना अपील प्रक्रियेविषयीही माहिती दिली जात असून, अंतिम मतदार यादीबाबत जिल्हाधिकारी/कार्यकारी दंडाधिकारी आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे अपील करण्यासंदर्भातील प्रशिक्षणही दिले जात आहे.

यात विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान झालेल्या विशेष सारांश पुनरावलोकनानंतर बिहार, हरियाणा आणि दिल्लीतील कोणतेही अपील दाखल झाले नाही.

प्रशिक्षण कार्यक्रमात परस्परसंवादी सत्र, घरोघरी सर्वेक्षणांचे अनुकरण, प्रकरण अभ्यास व फॉर्म ६, ७ आणि ८ भरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. त्याचप्रमाणे, सहभागी अधिकाऱ्यांना मतदार सहाय्य ॲप (VHA) व आयटी साधनांचा वापर शिकवण्यात येत असून, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांचे सादरीकरण व मॉक पोल्सही यामध्ये समाविष्ट आहेत, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/