‘मेट्रो लाईन-९’ वेस्टर्न हायवेवरील वाहतूक कोंडी कमी करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांच्या उपस्थितीत मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात

ठाणे, दि.१४ (जिमाका): मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) एक ऐतिहासिक क्षण ठरलेल्या आजच्या दिवशी, मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला औपचारिकपणे सुरुवात झाली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा कार्यान्वित होण्याच्या दिशेने आज महत्वाचे पाऊल उचलले गेले. मेट्रोच्या या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मेट्रोची तांत्रिक पाहणीही करण्यात आली. ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार निरंजन डावखरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार मनिषा चौधरी, माजी खासदार गोपाल शेट्टी, एमएमआरडीए महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महानगर आयुक्त–१,  विक्रम कुमार, एमएमआरडीए च्या व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल रूबल अग्रवाल आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, सहायुक्त दत्ता शिंदे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, तहसिलदार निलेश गौड व अन्य अधिकारीही उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिल्यांदाच मेट्रो आणि उड्डाणपूल एकत्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहेत. मिरा-भाईंदरसाठी ही लाईन मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. २०२७ पर्यंत मेट्रो प्रवासाचा झपाट्याने विस्तार होईल.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरारपर्यंतच्या विस्तारामुळे ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मेट्रोशी थेट जोडणी मिळेल. एमएमआरडीएच्या च्या नेतृत्वात ३३७ किमी लांबीचं मेट्रो नेटवर्क उभारले जात आहे. दरवर्षी ५०-६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा मानस आहे. यामुळे वाहनांची गर्दी कमी होईल आणि प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मेट्रो लाईन-९ ही सर्वसामान्य प्रवाशांच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरणारी आहे. कमी वेळात जास्त अंतर पार करण्याची सुविधा, इंटरचेंजेसमुळे अधिक सुगम प्रवास, आणि एकूणच आर्थिक गतिशीलता वाढवणारा महत्त्वाचा टप्पा आहे.

डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे महानगर आयुक्त, एमएमआरडीए म्हणाले, “मेट्रो लाईन-9 ही फक्त एक नवीन लाईन नाही, तर मिरा-भाईंदरला संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. ही लाईन मेट्रो 2A, 7, 1 आणि भविष्यातील लाईन 10 व 13 शी सहजपणे जोडली जाईल. त्यामुळे मिरा-भाईंदरहून अंधेरी, घाटकोपर, ठाणे आणि वसई-विरारसारख्या भागात अखंड प्रवास शक्य होईल. ‘मिनिटांत मुंबई’ ही आपली संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ही लाईन एक निर्णायक पाऊल आहे.

ही ट्रायल रन फक्त एक तांत्रिक चाचणी नसून मिरा-भाईंदरसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी शाश्वत, सुलभ आणि सर्वसमावेशक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.

मेट्रो लाईन-९ ठाणे जिल्ह्याचा बदल घडवणारा प्रकल्प

मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला आहे, जिथे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत. मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा हा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत  ४.४ किमी लांबीचा असून या मार्गावर चार स्थानके आहेत – दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव.

जोडणीचे नवे दालन

या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे आणि वेगवान होणार आहे

  • CSMIA आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी (लाइन 7, 7A द्वारे)
  • अंधेरी पश्चिम (लाइन 2B)
  • घाटकोपर (लाइन 1 व 7)
  • लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन 2A)
  • मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन 10 व्दारे ठोण्याला जोडणे (भविष्यात)
  • भविष्यात वसई-विरार (लाइन 13 – NSCB स्थानक)

अपेक्षित फायदे

  • दहिसर टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल
  • प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट
  • ऊर्जा बचतीसाठी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्रज्ञान
  • पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा वापर
  • सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेत बचत

०००