पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

अवकाळीमुळे नुकसान; कृषी दर्जा निकषानुसार मदत

मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आलेला आहे. त्या निकषानुसार नुकसानग्रस्त मत्स्य व्यवसायिकांना तात्काळ मदत देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

पालघर व ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मत्स्य व्यवसाय संबंधित झालेल्या नुकसानीबाबत मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन विभागाचे सह सचिव कैलास गायकवाड, अवर सचिव सुनिल सावंत, मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त किशोर तावडे, उपसचिव किशोर जकाते व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, ६ मे २०२५ रोजी झालेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील मच्छीमारांच्या सुमारे ९६ बोटींचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील अर्नाळा येथील अनेक मच्छीमारांचे सुकवण्यासाठी घातलेल्या मासळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकताच मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आलेला असून त्यानुसार मदत करण्यात येईल, असेही मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले की, नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांना शेतकऱ्यांप्रमाणे योग्य ती नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तसेच शासन निर्णयात काही बाबींसाठी तरतूद, वाढीव मागणीबाबत मदत व पुनर्वसन विभागाने प्रस्ताव तयार करावा, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

मत्स्य व्यवसायाच्या अवकाळी नुकसानीबाबत वाढीव मागणीचा प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.

०००

मोहिनी राणे/ससं/