मुंबई, दि. १५: पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सबंधित यंत्रणेला दिले.
विधानभवनात लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड व निगडी, पुणे येथील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडी संघटनेचे अध्यक्ष यशवंत भोसले, कामगार आयुक्त एच.तुम्मोड, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त वा.व.वाघ, पुण्याचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, पिंपरी चिंचवड व निगडी येथील लोकमान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी चौकशी पथकाची नेमणूक करण्यात यावी. यामध्ये उपसंचालक आरोग्य सेवा पुणे मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी, पोलीस क्राईम विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त, अपर कामगार आयुक्त पुणे, सहकारी संस्थेचे उपनिबंधक, भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश करावा. या पथकाने चौकशी अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना उपाध्यक्ष बनसोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
०००
मोहिनी राणे/ससं/