प्रशासनात सुसूत्रता आवश्यक-विभागीय आयुक्त दिलीप गावडे

उपगट समितीची कार्यशाळा

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका)- प्रशासनाचे कामकाज करतांना ते सर्वव्यापी असते. मात्र असे असतांना उत्कृष्ट परिणामकारकता येण्यासाठी प्रशासनात सुसूत्रता आवश्यक असते,असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केले.

तालुका, उपविभाग, जिल्हा व विभागीय स्तरावर गठीत विविध समित्यांचा आढावा घेऊन त्यात सुसूत्रता आणण्यासाठी स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय उपगट समितीची कार्यशाळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर विभागीय आयुक्त खुशालसिंग परदेशी, विकास देशमुख, नांदेडचे अपर जिल्हाधिकारी बोरगावकर, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, डॉ. सुचिता शिंदे, नीलम बाफना तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की, शासनाने तालुका, उपविभाग, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर व काही राज्यस्तरीय समित्या स्थापन केलेल्या आहेत. कायद्यानुसार, न्यायालयाच्या निर्णयांनुसार, शासन निर्णयानुसार अशा विविध निमित्ताने समित्यांचे गठन केले जाते. त्यातून अधिकारांचे विकेंद्रीकरण होणे व विभागांच्या संरचनेनुसार कामकाज केले जाते. हे करतांना या समित्यांच्या आवश्यकता तपासणे, सदस्य संख्या , विविध विभागांचा समन्वय तपासणे, कामाची पुनरुक्ती होतेय का? इ. बाबींची तपासणी करणाऱ्या अभ्यासगटाला मदत करण्यासाठी उपगटाने वेळेत आपले कामकाज करुन अहवाल द्यावा. प्रशासनाचे सुसूत्रीकरण व सुलभीकरण करण्यासाठी आपले योगदान द्यावे,असे आवाहन श्री. गावडे यांनी केले.

प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविक केले व उमाकांत पारधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००