नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळास कामठी येथे जागा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई दि. १५: नागपूर गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळासाठी कामठी येथे आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

बैठकीस उपसचिव अजित कवडे, अश्विनी यमगर यांच्यासह महसूल व गृहनिर्माण विभागाचे अधिकारी उपस्थ‍ित होते. तर नागपूर येथून कामठी नगरपालिकेचे व म्हाडाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, कामठी परिसरात ६ हजार घरे बांधणीचे कामठी नियोजन करावे. या घरांसाठी आधार आधारित नोंदणी सुरू करावी. घर बांधणीसाठी सविस्तर आराखडा तयार करावा. तसेच कामठी येथे ६ एकर जागेवर १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल  बांधण्यासाठी आरोग्य विभागाकडे प्रस्ताव सादर करावा.

म्हाडाच्या ज्या जागेवर अतिक्रमण झाले आहे त्या जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कंपाऊंड घालावे. कामठी येथील कुंभारी कॉलनीतील घरे  नियमानुकुल करून देण्यासाठी येथील रहिवाशांकडून केवळ मुद्दल देऊन व्याज माफ करावे, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

घरकुल बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्धसाठी महसूल विभागाने काढलेल्या निर्णयाच्या आधारे म्हाडाने त्यांच्या स्तरावर परिपत्रक काढावे, अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी दिल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/