छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

नवी दिल्ली, दि. १५ : छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध त्यांच्या चरित्रातून मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व सांस्कृतिक महोत्सव दिल्ली यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिवाजी जाधवराव, आचार्य श्रीजामोदेकर बाबा, सुदर्शन न्यूज चॅनेलचे संचालक डॉ. सुरेश चव्हाण, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर, गायक व संगीतकार डॉ. राजेश सरकटे, शिव व्याख्याते प्रा. रविंद्र बनसोड यांच्यासह संघटेनेचे मान्यवर मंचावर उपस्थित होते.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री जाधव म्हणाले की, छत्रपती शंभूराजांनी छत्रपती शिवरायांचा वारसा समर्थपणे चालविला. शंभूराजे यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. त्यांना साहित्यातही रस होता, ते भाषाप्रेमी होते. छत्रपती शंभूराजांच्या विचारांचा अंगिकार हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले.

महाराष्ट्र सदनात सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते हितेश पटोळे यांनी तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन व अभिवादन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातही छत्रपती शंभूराजेंच्या पुतळयाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रा. राजेश सरकटे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रा. डॉ. प्रभाकर जाधव यांच्या ‘मराठा टुरिझम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. व्याख्याते प्रा. रवींद्र बनसोड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ओजस्वी व्याख्यान दिले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जयंती महोत्सव अध्यक्ष व छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. विलास पांगारकर, छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, सरचिटणीस परमेश्वर नलावडे, स्वागत अध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, प्रा. राजेश सरकटे, विनोद सरकटे, अक्षय ताठे, सतीष जगताप आणि अमोल टकले यांनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी झाला.

०००

अंजु निमससरकर, माहिती अधिकारी