छत्रपती संभाजीनगर, दि.16 मे, (विमाका) :- मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून सक्षम अधिकारी व कर्मचारी तयार झाल्याचे चित्र राज्याला निश्चितपणे पहायला मिळेल, असा विश्वास पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज व्यक्त केला. सर्वसामान्य जनतेला तत्परतेने सेवा देण्यासाठी प्रशिक्षणाचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
नाथनगर (उत्तर) पैठण येथील मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी या संस्थेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशिक्षण व निवासस्थान इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर विकास जैन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, प्रबोधिनीचे संचालक खालिद ब.अरब व निबंधक रतनसिंग साळोक, सहायक प्राध्यापक विवेक मंडलीक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. शिरसाट म्हणाले, नाथसागर लगतच्या परिसरात असलेली ही प्रशिक्षण प्रबोधिनी मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. या प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी-कर्मचारी नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासोबतच योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतील. त्यातुन मराठवाडा प्रगतीपथाकडे जाण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेत येणारे नवीन बदल स्वीकारण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे. शासकीय सेवेत असलेल्या विविध पदावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून संवाद निर्माण होईल. तसेच प्रशिक्षणातून कामकाजात बदल होण्यासही मदत होईल. त्यामुळे प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय सेवेतील बदल स्वीकारण्यासोबतच शासनाने निश्चित केलेले प्रशिक्षण आवडीने पूर्ण करावे असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय सेवेत कामकाज करताना अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तर ते निश्चितपणे अधिक चांगली सेवा देतील. आपल्या कर्मचाऱ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले पाहिजे. असे सांगुन पालकमंत्री श्री.शिरसाट म्हणाले, पैठण येथे कार्यरत असलेले प्रशिक्षण केंद्र राज्यातील एक चांगले प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखले जाईल, या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी संवाद वाढवावा, तसेच पुढील कालावधीत या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सक्षम अधिकारी कर्मचारी तयार झालेले राज्याला पहायला मिळतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. शुभेच्छा संदेशात बोलतांना श्रीमती सौनिक म्हणाल्या, पैठण येथील ही प्रबोधिनी केवळ एक प्रशिक्षण केंद्र न राहता एक विचार केंद्र ठरेल, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल गव्हर्नंस, सायबर सुरक्षेची जाणीव, आणि डेटा आधारित निर्णय प्रक्रियेवर विशेष भर या ठिकाणी देण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण संस्थेला 2013 मध्ये विभागीय प्रशिक्षण संस्थेचा दर्जा मिळाला. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी वर्ग-२ व वर्ग-३ अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ही प्रशिक्षण संस्था सातत्याने प्रशिक्षण देण्याचे काम करते. प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासकीय सेवेतील पहिले प्रशिक्षण, उजळणी प्रशिक्षण व पदोन्नतीनंतरचे प्रशिक्षण अशा पातळीवर वर्षभर प्रशिक्षणाचे काम सुरू आहे. राज्यात सहा महसूली विभागात असलेल्या प्रशिक्षण संस्थेपैकी पैठण येथील प्रशिक्षण संस्थेचे राज्यात चांगले नाव आहे. या संस्थेने 28 वर्षात 20 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
पैठण येथील या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेले अधिकारी तसेच कर्मचारी केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करतील असा विश्वास व्यक्त करून या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी करावा, असे आवाहनही श्री.गावडे यांनी केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, पैठण येथील प्रशिक्षण प्रबोधिनी ही मराठवाड्यासाठी नामांकित प्रबोधिनी आहे. राज्य शासनाने सद्य:स्थितीत अनेक उपक्रम हाती घेतले आहे. यामध्ये 100 दिवस, 150 दिवस या उपक्रमासह माहिती अधिकार, सेवाहक्क अधिनियम कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे आहे. पैठण येथील प्रबोधिनीमध्ये जलदगतीने पारदर्शक व संवेदनशील पद्धतीने सेवा देण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या शुभेच्छा संदेश असलेली चित्रफित दाखविण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.