मुंबई, दि. २०: महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांना राज्याच्या मंत्रीपदाची शपथ दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभात राज्यपालांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, उद्योग ,मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्ध व्यवसाय विकास विभाग मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, तसेच मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
सुरुवातीला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपालांची अनुमती मागितली. त्यानंतर राज्यपालांनी छगन भुजबळ यांना शपथ दिली. शपथविधी नंतर राज्यपालांनी मंत्री भुजबळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
०००
मंत्री छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ यांचा परिचय
जन्म: १५ ऑक्टोबर १९४७.
जन्म ठिकाण: नाशिक.
शिक्षण: एल.एम.ई. (आय), (मेकॅनिकल इंजिनिअर).
ज्ञात भाषा: मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती मीना.
अपत्ये: एकूण १ (एक मुलगा)
व्यवसाय: शेती.
पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
मतदारसंघ: ११९ – येवला, जिल्हा-नाशिक.
इतर माहिती: संस्थापक-अध्यक्ष, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट, बांद्रा, मुंबई, माजी विश्वस्त, व्हि.जे. टी.आय. संस्था, मुंबई, विश्वस्त, नायर रुग्णालय, विश्वस्त, प्रिन्स आगा खान रुग्णालय, मुंबई; संस्थापक, महात्मा फुले समता परिषद, या संस्थेमार्फत उपेक्षित पद-दलित, मागासवर्गीयांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न तसेच, महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व आदर्शाचा प्रचार व प्रसार, ५ नोव्हेंबर २०१० रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मुंबई भेटीदरम्यान महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ या पुस्तकाचा ‘स्लेव्हरी’ हा अनुवादीत ग्रंथ भेट दिला. माजी विश्वस्त, मुंबई पोर्ट ट्रस्ट, १९८५ ‘दैवत’ व १९९० ‘नवरा बायको’ या मराठी चित्रपटांची निर्मिती; १९७३ सदस्य, १९७३-८४ विरोधी पक्षनेते, १९८५ व १९९१ महापौर, मुंबई महानगरपालिका; याकाळात गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधारणा, मुंबई शहराचे सौंदर्यकरण, चौकांचे सुशोभिकरण, हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण केले; १९९१ अध्यक्ष, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स, १९९१ पर्यंत शिवसेनेत विविध पदावर कार्य; १९९१ नंतर काँग्रेस पक्षात कार्यरत; जून १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य; संस्थापक-सदस्य व जून १९९९ ते नोव्हेंबर १९९९ महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष; १९८५-९०, १९९०-९५, २००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा १९९६-२००२ व २००२-२००४ सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषदः डिसेंबर १९९१ ते मार्च १९९३ महसूल खात्याचे मंत्री; मार्च १९९३ ते मार्च १९९५ गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधार, घरदुरुस्ती आणि पुनर्बाधणी खात्याचे मंत्री; १९९६-१९९९ विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषदः ऑक्टोबर १९९९ ते जानेवारी २००३ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह आणि पर्यटन मंत्री, नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००३ मुंबई शहराचे पालकमंत्री; जानेवारी २००३ ते डिसेंबर २००३ उपमुख्यमंत्री व गृह मंत्री; नोव्हेंबर २००४ ते ऑक्टोबर २००९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) या खात्यांचे मंत्रीः नोव्हेंबर २००९ ते नोव्हेंबर २०१० दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याचे मंत्री; नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री; या काळात दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाची वास्तु उभी केली, ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवडः जानेवारी २०२० मध्ये अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री, नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
छंद : क्रिकेट, चित्रपट, वाचन व प्रवास
परदेश प्रवास : १९८० आणि १९८६ मध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलैंड आणि रशिया या देशाचा अभ्यास दौरा; १९९१ मध्ये ओसाका, जपान येथे जागतिक महापौर परिषदेसाठीच्या शिष्टमंडळासमवेत सहभाग, ऑक्टोबर २००० मध्ये फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड, दुबई, मस्कत, अबुधाबी, कॅनडा, फ्रान्स, नेदरलँड, बेल्झिअम व स्विर्त्झलँड इत्यादी देशांचा अभ्यास दौरा, याच दौऱ्यात लंडनमधील स्कॉटलँड यार्ड पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चाः २८ मे २००१ ते १८ जून २००१ या काळात न्यूयॉर्क, जिनिव्हा, लंडन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा तसेच ऑस्ट्रिया, स्वीडन, नॉर्वे, स्पेन इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.
०००