मुंबई, दि. 20 : कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या गरजेनुसार परिपूर्ण योजना तयार करून त्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा. या योजनेमध्ये इतर योजनांचा लाभ घेण्यास पात्र होणार नाहीत अशा कामगारांना लाभ मिळेल अशा तरतुदी कराव्यात, अशा सूचना कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिल्या.
प्रभादेवी येथील कामगार व क्रीडा भवन येथे कामगार कल्याण मंडळाची आढावा बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री जयस्वाल बोलत होते.
कामगार कल्याण मंडळाच्या सर्व योजनांचे सामाजिक मूल्यांकन करावे अशा सूचना देऊन राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, या योजनांचा आतापर्यंत किती कामगारांना लाभ झाला याची माहिती सदर करावी. कामगारांमध्ये मंडळाच्या योजनांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. त्यासाठी समाजमाध्यमातून याचा प्रसार करावा. अपघाती मृत्यू, दुर्धर आजार, कामगारांच्या मुलांचे शिक्षण व सामाजिक सुरक्षा या बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, कला आणि क्रीडा प्रशिक्षण केंद्र अशा सुविधा उभारण्यात याव्यात. मंडळाच्या मालमत्तापासून महसूल उत्पन्न वाढवण्यासाठीचा आराखडा तयार करावा अशा सूचना राज्यमंत्री श्री. जयस्वाल यांनी दिल्या.
बैठकीस कामगार आयुक्त रविराज इळवे, कामगार विभागाच्या उपसचिव रोशनी पाटील – कदम यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/