मुंबई, दि. 20 : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे नागपूर, कोराडी येथे महिलांकरिता आधुनिक गारमेंट सेंटर अंतर्गत महिलांना प्रशिक्षण, विद्यावेतन व रोजगार उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व प्रकल्प सुरू करून अहवाल सादर करावा. कोराडी येथील विविध प्रकल्प कालबद्धतेत सुरू करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी महिलांना नियमित प्रशिक्षण आणि विद्यावेतन अदा करण्यासंदर्भात मागणी केली होती.
माविम अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करणे, प्रदुषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प, सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्प संदर्भात मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या.
यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, विभागाचे सह सचिव वी. रा. ठाकूर, महाव्यवस्थापक रवींद्र सावंत उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महामंडळाअंतर्गत नागपूर येथे बचत गटातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या कोराडी येथील गारमेंट केंद्रात शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एकच निविदा प्रक्रिया राबवावी व कालमर्यादेत केंद्र सुरू करावे. त्यांना नियमित सहा महिन्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना प्रशिक्षणासाठी दिले जाणारे विद्यावेतन वेळेत देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या केंद्राद्वारे जवळपास २०० महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
याचबरोबर महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध जागेत अगरबत्ती निर्मिती युनीट प्रकल्प मंजूर आहे. येथे अगरबत्ती व धूप निर्माण करण्याच्या माध्यमातून जवळपास १०० महिलांना ६ ते ७ हजार रूपये महिन्याला मिळणार आहेत. तसेच प्रदूषणविरहित कलमकारी तथा वस्त्रप्रक्रिया प्रकल्प आणि सॅनिटरी नॅपकीन निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध होणार असून, हे प्रकल्प तातडीने सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असे मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.
००००
श्रद्धा मेश्राम/विसंअ/