मुंबई, दि. 20 : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी शाळांना आवश्यक शिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतनच्या विविध समस्यांबाबत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. प्रधान सचिव रणजित सिंह देओल, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, संचालक (योजना) महेश पालकर, उपसचिव समीर सावंत आणि संबंधित शाळांचे प्राचार्य यावेळी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी पाचही शासकीय विद्यानिकेतनच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. श्री. भुसे म्हणाले, सुमारे 60 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. येत्या काळात विद्यानिकेतनमध्ये शिक्षक आणि अन्य भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल. बैठकीदरम्यान शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि धुळे येथील जिल्हाधिकाऱ्यांशी शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत दूरध्वनीद्वारे चर्चा केली.
दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या निवासी शासकीय विद्यानिकेतनमध्ये दर्जेदार शिक्षक उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्यासाठी आवश्यकता भासल्यास शिक्षकांच्या भरती नियमांमध्ये सुधारणा करावी, शाळांना भौतिक आणि अन्य सुविधांसाठी कंपन्यांचा सीएसआर फंड उपलब्ध करुन घेण्याचा प्रयत्न करावा, असे आदेशही श्री. भुसे यांनी दिले. शिक्षक आणि सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पटसंख्या वाढविण्यासाठी शाळांनीही एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीस शासकीय विद्यानिकेतन धुळेच्या प्राचार्य मंजुषा क्षीरसागर, शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगरच्या प्राचार्य सुनीता राठोड, शासकीय विद्यानिकेतन अमरावतीचे प्राचार्य दिनेश सोनोने, शासकीय विद्यानिकेतन पुसेगावचे प्राचार्य विजय गायकवाड आणि शासकीय विद्यानिकेतन केळापूर (जिल्हा यवतमाळ) चे प्राचार्य धम्मरत्न वायवळ उपस्थित होते.
0000