महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा विधिमंडळाच्या याच अधिवेशनात – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 5 : महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील दिशा कायदा लवकरात लवकर आणत आहोत. यासंदर्भात विधिमंडळाच्या महिला सदस्यांशीही चर्चा करण्यात आली असून विधिमंडळाचे चालू अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याच्या आत हा कायदा करण्यात येईल. त्याचबरोबर ॲसिड हल्ल्याप्रमाणे पेट्रोल हल्ल्यातील पीडितेलाही मनोधैर्य योजनेतून मदत केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत सांगितले.

महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अध्यक्ष नाना पटोले यांनी विशेष प्रस्ताव विधानसभेत मांडला होता, त्यावर विधानसभेत दिवसभर चर्चा होऊन सदस्यांनी अनेक उपाययोजना सुचविल्या, त्यानंतर या चर्चेस उत्तर देताना गृहमंत्री श्री. देशमुख बोलत होते.

श्री.देशमुख म्हणाले, अनेक ठिकाणी महिलांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात घेतल्या जात नाहीत अशा तक्रारी आहेत. पण आता ऑनलाईन एफआयआर दाखल करण्यासाठी सीसीटीएनएस ही प्रणाली सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे यावर कोठूनही तक्रार दाखल करता येणार आहे. महिलांच्या प्रकरणात कर्तव्यात कुचराई करणाऱ्या अकोल्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सध्या राज्यात २८ हजार महिला पोलीस कार्यरत आहेत. हे प्रमाण एकूण पोलिसांच्या १५ टक्के इतके आहे. हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत नेण्यात येणार आहे. ८ हजार पोलिसांची भरती करण्यात येत असून त्यात महिला पोलिसांचीही भरती केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे न्यायालयात गतिमान करण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांसंदर्भात केंद्र शासनाकडून ६० टक्के निधी मिळतो. यासाठी येत्या पंधरवड्यात दिल्ली येथे जाऊन या निधीच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.5.3.2020