मुंबई, दि. २१ : पशुसंवर्धन विभाग अधिक सक्षम होण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध ठोस निर्णय घेतले आहेत. पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदांपाठोपाठ आता सहायक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून या पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहिरात प्रसिद्ध करून प्रक्रिया सुरू केली आहे.
पशुसंवर्धन विभागाने पूर्ण क्षमतेनेकाम करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एकापाठोपाठ एक असे महत्वाचे निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
विभागातील रिक्त पदांमुळे पशुपालक, शेतकरी यांना सेवा देण्यास येणारी अडचण लक्षात घेऊन विभागातील आवश्यक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी त्यांनी पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील 2795 पदे भरण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर करण्यात आले.
त्यानंतर आता प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ या संवर्गातील सहायक आयुक्त, पशुसंवर्धन ही ३११ पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवले. या भरतीची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी श्रीमती मुंडे यांनी पाठपुरावा केला.
एम.पी.एस.सी.ने सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन या संवर्गातील ३११ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून २० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविले आहेत.
कामास येणार गती
ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पशुसंवर्धन विभागाला सक्षम आणि नवीन अभ्यासू अधिकारी मिळणार आहेत. त्यातून ग्रामीण भागातीलपशुसंवर्धन विभागाचे काम आणखी वेगाने व पूर्ण क्षमतेने होण्यास मदत होणार असून पशुपालकांना चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ/