मुंबई, दि. २१ : अलमट्टी धरणाच्या उंची वाढ संदर्भात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि कृती समितीने मांडलेल्या मुद्यांचा विचार करता या संदर्भात येत्या १५ दिवसात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यामधील कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सर्वश्री अरुण लाड, इद्रिस नायकवडी डॉ. विनय कोरे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अमल महाडिक, सत्यजित देशमुख, सुहास बाबर, अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे व उल्हास पाटील, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले आणि कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले, अलमट्टी धरण संदर्भात महाराष्ट्र शासनाने न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनाही याबाबत विनंती करण्यात आली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी प्राधान्याने उपाय योजना राबविण्यात येत आहेत. नदीची वहन क्षमता वाढविण्यासाठी नदीतील गाळ काढण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ८० ते ८५ टीएमसी पुराचे पाणी वळविले जाईल. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्यात येणार असल्याने पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असल्याचेही जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अलमट्टी धरण उंची संदर्भात आपल्या भूमिका तसेच कृती समिती मधील सदस्यांनी सूचना मांडल्या.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ/