आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्यासाठी बालसाहित्याची निर्मिती व्हावी- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

बाल पुस्तक जत्रा राज्यभरात जिल्हास्तरावर व्हाव्यात - मंत्री उदय सामंत

पुणे, दि. 22: आपला थक्क करणारा इतिहास मुलांना समजण्याच्या दृष्टीकोनातून बालसाहित्याची निर्मिती झाली पाहिजे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून साहित्याचे संस्कार, ज्ञान आणि ज्ञानाची परंपरा आणि त्याचा अभिमान निर्माण होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महानगर पालिका, पुणे पुस्तक महोत्सव संवाद यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल, बुलढाणा अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, लेखक ल. म. कडू, लेखिका संगीता बर्वे, साहित्यिक राजीव तांबे, संवाद संस्थेचे संस्थापक संचालक सुनील महाजन, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, आपला थक्क करणारा इतिहास नीट मांडला गेला नसल्याने आपल्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. लहान मुलांची ग्रहण करण्याची क्षमता मोठी असल्याने हा इतिहास पोहोचवण्याचे मोठे माध्यम लहान मुले आहेत. जगातील पहिला शब्दकोश भारतात निर्माण झाला, पहिली शस्त्रक्रिया भारतात झाली, पहिले विद्यापीठ आपल्या इथे झाले. हे मुलांना समजले पाहिजे यासाठी छोट्या छोट्या पुस्तकांची निर्मिती झाली पाहिजे.

भारतीय खेळ हे मुलांना जास्त निरोगी बनवत होते, जास्त एकाग्रता निर्माण करतात. कोल्हापूर येथे खेळघर संकल्पना राबविली जात आहे. खेळाच्या माध्यमातून बुद्धीचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातो आणि वाचायची सवय लावतो. हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी श्री. पांडे यांचे अभिनंदन केले.

बाल पुस्तक जत्रा राज्यभरात जिल्हास्तरावर व्हाव्यात- उदय सामंत

उदय सामंत म्हणाले, पुस्तकांची जत्रा हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. जे साहित्य निर्माण होते त्याच्या मागे शासन उभे करण्याची जबाबदारी आमची आहे. परंतु, पुस्तक महोत्सव भरविण्यासाठी पुणे शहराच्या बाहेरही पडले पाहिजे. अशा महोत्सवातून बाल पुस्तकांची चळवळ उभी राहील अशी आशा आहे. पुण्याला मराठीचा वारसा, सांस्कृतिक वारसा, शिक्षणाची पंढरी असून येथे जे काही मराठी भाषेत निर्माण होते त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत असतात. त्यामुळे अशा बाल पुस्तकाच्या जत्रा जिल्हास्तरीय झाल्या पाहिजेत, यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्याचे संयोजन आणि नियोजनाची जबाबदारी पुणे पुस्तक महोत्सवाने घ्यावी, अशी अपेक्षा श्री. सामंत यांनी व्यक्त केली.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, पुणे हे शहर वाचनसंस्कृती आणि खाद्यसंस्कृती असलेले आहे. या जत्रेमध्ये येथे बालकांसाठी खेळ येथे पाहायला मिळाले. खेळांमुळे एकाग्रता वाढते, शारीरिक क्षमता वाढतात. आम्हाला आई वडिलांनी पुस्तकांची खूप आवड लावली. पुण्यात पुस्तकांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. वाचन संस्कृती कितीही पुढे गेली आणि आज लॅपटॉप, संगणक आदींवर पुस्तके वाचायला मिळत असली तरी पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा, पुस्तकाचा स्पर्श हाताला होऊन ते वाचणे याच्यामध्ये खूप वेगळी मजा आहे, असे सांगून हा उपक्रम राबविल्याबद्दल श्रीमती मिसाळ यांनी श्री. पांडे यांचे अभिनंदन केले.

मिलिंद मराठे म्हणाले, येणाऱ्या काळात पुण्याच्या पुस्तक महोत्सवाच्या यशस्वीततेनंतर नागपूर आणि मुंबई येथे पुस्तक महोत्सव भरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासामार्फत ग्रंथालयांचे जाळे (नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज) निर्माण करणे आणि समुदाय ग्रंथालयांची सुरूवात (इनिशिएशन ऑफ कम्युनिटी लायब्ररीज) याचा एक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात कम्युनिटी लायब्ररीचे जाळे निर्माण करून त्यातून वाचन संस्कृती वाढावी असा प्रयत्न यातून होणार असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात राजेश पांडे म्हणाले, आजकाल वचन कमी झाले आहे असे म्हटले जाते. मात्र, पुणे पुस्तक महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य जगताला, प्रकाशक जगताला अतिशय ऊर्जा मिळाली. दिल्लीतील राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या जागतिक पुस्तक प्रदर्शनाला मुलांचा प्रतिसाद पाहता पुण्यातही असा उपक्रम राबविण्याची संकल्पना समोर आली. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात येत असून कदाचित भारतातील पहिलाच असा बाल जत्रेचा उपक्रम असेल, असेही ते म्हणाले.

प्रारंभी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉलला भेटी देऊन पाहणी करून स्टॉलधारकांशी संवाद साधला. मुलांचे खेळ पाहतानाच स्वत: त्यांनी विटी-दांडू हाती घेऊन खेळाचा थोडा आनंद घेतला. राज्यमंत्री मिसाळ यांनी लगोरी खेळाचा आनंद लुटला.

यावेळी पालक, लहान मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. पुस्तके हातात घेताना होणारा आनंद बालकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खेळांचा आनंदही त्यांनी मनमुराद लुटला.
0000