मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दहावी-बारावीच्या गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर सन्मान केला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना ५ हजार ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल चालविले जातात. यातील काही शाळा राज्य शिक्षण मंडळ तर काही शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. या दोन्ही मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दहावीसह बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील प्रत्येकी पाच गुणवंत मुला-मुलींना पारितोषिक दिले जाणार आहे.
गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह गुण मिळवणाऱ्या प्रथम पाच मुला-मुलींना राज्य, अपर आयुक्त आणि प्रकल्प कार्यालय स्तरावर गौरविण्यात येणार आहे. सीबीएसई बोर्डाचे विभागीय मंडळ नसल्याने ते वगळून राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातील प्रत्येकी २४ गुणवंतांना दहा महिन्यांसाठी प्रतिमाह एक हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. अपर आयुक्त आणि प्रकल्प स्तरावर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतून प्रथम येणाऱ्या तीन मुला-मुलींना सन्मानित करण्यात येणार आहे. दरम्यान, १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांचा सत्कार केला जाणार आहे.
असे मिळणार रोख पारितोषिक (रुपये)
क्रमांक-राज्य-अपर आयुक्त-प्रकल्प कार्यालय
प्रथम क्रमांक राज्य ३० हजार, अपर आयुक्त १५ हजार, प्रकल्प कार्यालय १० हजार
द्वितीय क्रमांक राज्य २५ हजार, अपर आयुक्त १० हजार, प्रकल्प कार्यालय ७ हजार
तृतीय क्रमांक राज्य २० हजार, अप्पर आयुक्त ७ हजार, प्रकल्प कार्यालय ५ हजार
चतुर्थ क्रमांक राज्य १५ हजार
पाचवा क्रमांक राज्य १० हजार
अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गुणवत्तेबाबत आवड निर्माण करण्यासाठी ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ सुरु करण्यात आली आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालय, अपर आयुक्त आणि राज्यस्तरावर रोख पारितोषिक देऊन सत्कार केला जाणार आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळेच्या मुख्यध्यापक आणि शिक्षकांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे.
-डॉ. अशोक वुईके, आदिवासी विकास मंत्री |
००००