विज्ञान सोपे करुन सांगण्यात जयंत नारळीकर यांचे मोठे योगदान – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. 24 मे : विज्ञान सोपे करुन सांगण्यात पद्मभूषण प्रा.जयंत नारळीकर यांचे मोठे योगदान होते. मुलांना विज्ञानाची गोडी खऱ्याअर्थाने जयंत नारळीकर यांनी लावली, असे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी काढले.

भारतीय विज्ञानजगताचे अध्वर्यू, पद्मभूषण प्रा.जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामार्फत दि. 23 मे रोजी आयोगाच्या कार्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ.अ.वि सप्रे, नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे,⁠ प्राचार्य अनिरुद्ध पंडित यांच्यासह आयोगाचे सदस्य व विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र या क्षेत्रात प्रा.नारळीकर यांनी भारताला जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळवून दिली. त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानाचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार केला. त्यांनी विज्ञानाला केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न ठेवता, पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या सहज सोप्या शैलीतून नव्या पिढीशी जोडण्याचे कार्य केले. पद्मभूषण प्रा.जयंत नारळीकर यांचे कार्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत मंत्री ॲड.शेलार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
000