कर्करुग्णांच्या उपचार खर्चात होणार बचत

स्वस्ती निवासमध्ये कर्करुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांच्या राहण्याची सोय; उपचारांमध्ये राहणार सातत्य

नागपूर, दि. 26 : कॅन्सर हा आजही पूर्णपणे बरा करता न येणारा आजार मानला जातो. भारतात विशेषतः ओरल आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे. नागपूर शहरातील मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यामुळे एक अत्याधुनिक उपचार केंद्राची आवश्यकता असल्याने डॉ. आबाजी थत्ते संस्थेने 2012 मध्ये 20 खाटांच्या रुग्णालयास प्रारंभ केला. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरने गेल्या काही वर्षांत मध्य भारतातील कॅन्सर उपचाराचे एक विश्वासार्ह केंद्र म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

कॅन्सर रुग्णाचा उपचारासाठी होणारा लांबचा प्रवास आणि अपुरी निवास व्यवस्था यामुळे त्यांच्या डॉक्टर अपॉइंटमेंट्स चुकू शकतात किंवा उपचारास विलंब होतो, ज्याचा परिणाम रुग्णाच्या उपचाराच्या सातत्यावर होतो. ही समस्या सोडविण्यासाठी डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनाने कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी निवासी सुविधा तयार करण्याची योजना आखली. ही सुविधा ‘ स्वस्ती निवास’ या नावाने ओळखली जाणार असून यातून कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान राहण्याची सोय उपलब्ध होईल. या सुविधेमध्ये ४०० रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सुसज्ज आणि आरामदायक निवासाची सोय असेल.  यामुळे कर्करुग्णांच्या उपचारात सातत्य राहून त्यांच्या उपचार खर्चातही बचत होणार आहे.

पर्नो रिका इंडिया या बहुराष्ट्रीय कंपनीने आपल्या समाजिक दायित्व निधी (CSR) उपक्रमाद्वारे स्वस्ती निवास प्रकल्पाला आर्थिक सहाय्य केले आहे. जे जे कन्सल्टंट्स स्वस्ती निवास इमारतीची निर्मिती करणार आहेत. या सुविधेच्या प्रस्तावित डिझाईनमध्ये सुविधा केंद्र संकुल, फूड कोर्ट, आणि एकूण १.७ लाख चौ. फूट बांधकाम क्षेत्राचा समावेश आहे.

साडे सात लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या ४७० खाटांच्या क्षमतेच्या, आधुनिक आणि भव्य अशा या दहा मजली रुग्णालयाचे उद्घाटन २७ एप्रिल २०२३ रोजी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. रुग्णालयात वैयक्तिक देखभाल, सवलतीच्या दरातील उपचार आणि अधुनिक संशोधन यावर भर देण्यात येतो.

गेल्या 8 वर्षांत संस्थेने दिलेल्या सेवेचा आढावा:

  • नवीन नोंदणीकृत रुग्ण: 46,699
  • ओपीडी भेटी: 10,60,313
  • इनपेशंट (आयपीडी): 1,36,507
  • रेडिएशन थेरपी घेतलेले नवीन रुग्ण: 8,494
  • रेडिओलॉजी तपासण्या: 1,19,531

‘कॅन्सरपासून मुक्तीचा पहिला टप्पा’ हे ब्रीदवाक्य असलेले हे रुग्णालय केवळ उपचार केंद्र न राहता, कॅन्सरविरोधातील लढ्याचे एक मजबूत शस्त्र बनले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था कार्यकरत असून, अध्यक्ष अॅड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य यशस्वीपणे पार पडत आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/