नागपूर, दि. 26 : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो. परिणामी कुटुंबियांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो. आजारपणातील भावनिक गुंतागुंत व संवेदना जपण्याचे केंद्र म्हणून स्वस्ती निवास ओळखले जाईल, असा विश्वास केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जामठा परिसरातील स्वस्ती निवास या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार समीर मेघे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर, वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, पर्नो रिका इंडियाचे जॉन तुबुल आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, अनेक संस्थांची कार्यपद्धती मी जवळून पाहिली आहे. अनेक संस्थांमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. तथापी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे ज्या संवेदनशीलतेने कॅन्सर रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना धीर देत उपचार केले जातात ती भावनिक आपुलकी इतरत्र कमी आढळते. येत्या काळात देशातील सर्वात चांगल्या संस्थेमध्ये नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूटची गणना होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी व्यक्त केला.
ज्या संस्थेमध्ये सेवाभाव असतो तसेच समाजात कुणीही दुःखी राहू नये ही भावना उराशी जपणारे सहकारी असतात त्या संस्था लोकांना अधिक भावतात. लाखो नागरिकांच्या दुःखात सहाय्यभूत होण्याचा विचार आजच्या काळात खूप महत्वाचा आहे. हा विचार खूप कमी लोकांमध्ये दिसून येतो या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅन्सर इन्स्टिट्युटचा गौरव केला.
आज ही संस्था अल्पावधीतच वटवृक्ष झाली आहे. स्वस्ती निवासच्या माध्यमातून या इन्स्टिट्युटला पूर्णत्व देण्याचे काम आता होत असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असल्याचे गौरोद्गार केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी यावेळी काढले.
मोठ्या प्रमाणावर मुखकर्करोग आपल्या देशात आढळतो. सर्वाइकल कॅन्सर ही आढळतो. काही वर्षांपूर्वी कॅन्सर हा दुर्धर आजार समजला जायचा. मात्र, आता देशभरात अनेक चांगल्या कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापना झाल्या आहेत. त्यापैकी नागपुरातील कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरली आहे. या इन्स्टिट्यूटला केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील आरोग्य क्षेत्रातील सेवा सुविधा अधिक भक्कम करण्यात येत आहेत. यात नवीन एम्सची निर्मिती, एमबीबीएस विद्यार्थी क्षमतेत वाढ, नवीन रुग्णालयांची निर्मिती व अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी सांगितले.
‘एनसीआय’ला देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून साकारू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था देशातील प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. येत्या काळात हे ध्येय आम्ही नक्की साकारू. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा रुग्ण आणि कुटुंबियांना उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कर्करोगावरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना निवासाची चांगली सुविधा निर्माण व्हावी यासाठी स्वस्ती निवासची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. इन्स्टिट्युटमार्फत अनेक उपक्रम राबविले आहेत. जागतिक स्तरावर जे सर्वोत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे ते येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संस्थेचा आतापर्यंत यशाचा चढता आलेख राहिला असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वस्ती निवासची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची पाहणी
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी भूमिपूजन समारंभापूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पाहणी केली. यावेळी त्यांनी इन्स्टिट्युटमधील सेवा व सुविधांबद्दल कौतुक केले. इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश जोगळेकर यांनी केंद्रीय मंत्री श्री. शाह यांना विविध सेवा व सुविधा विषयांची माहिती दिली.
‘स्वस्ती निवास’ विषयी…
डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्था व्यवस्थापनाने कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियासाठी निवासी सुविधा तयार करण्याची योजना आखली आहे. ही सुविधा ‘ स्वस्ती निवास ‘ या नावाने ओळखली जाणार असून यातून कॅन्सर रुग्णांना उपचारादरम्यान राहण्याची सोय उपलब्ध होईल. स्वस्ती निवासाच्या माध्यमातून ४०० रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध होईल. यातून रुग्णाच्या उपचारासाठी दीर्घकाळ राहण्याचा आर्थिक भार कमी होऊन कॅन्सर उपचार अधिक परवडणारे होण्यास मदत होणार आहे.
00000