पाणी पुरवठा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय स्तरावर भेटी द्या – मंत्री गुलाबराव पाटील

केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या दिल्ली येथील बैठकीत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक

मुंबई, दि.२७: शासनाच्या विविध पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे का, याची पडताळणी प्रत्यक्षस्थळी जाऊन करणे महत्त्वाचे आहे. तसेच, नागरिकांना सुरळीत व स्वच्छ पाणी मिळत असल्याची खात्री करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष भेटी द्याव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या दिल्ली येथील बैठकीत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने आढावा बैठक पार पडली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई.रवींद्रन, विभागाचे मुख्य अभियंता, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, या भेटींमुळे योजनांमध्ये येणाऱ्या अडचणी, अंमलबजावणीतील त्रुटी, तसेच स्थानिक स्तरावरच्या गरजा यांचा थेट आढावा घेता येईल आणि आवश्यक त्या सुधारणा तत्काळ करता येतील. तसेच यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून अडचणी जाणून घ्याव्यात. छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्राचे पथक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सहा योजनांना भेटी देणार आहेत. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने तयारी ठेवावी.

मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.  तसेच जळगाव जिल्ह्यातील १९८ नळ पाणी पुरवठा योजनेला महावितरणकडून विद्युत जोडणीची परवानगी मिळाली आहे. उर्वरित पाणी पुरवठा योजनेच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच गतीशक्त पोर्टलवर झालेल्या कामांची माहिती तत्काळ भरण्यात यावी,  अशी सूचना मंत्री पाटील यांनी केली.

०००

मोहिनी राणे/स.सं