२४ ते २६ मे दरम्यानच्या अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय
मुंबई, दि. २७ :- अतिवृष्टीच्या आपत्ती कालावधीत सर्व प्रतिसाद यंत्रणांसोबत प्रभावी समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्यकेंद्राला अत्याधुनिक संवाद यंत्रणा व आपत्तींच्या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या डीएसएस (Decision support system) ने सुसज्ज करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत ‘सचेत’ प्रणालीवरून लोकांना पाऊस व वीजबाबत पूर्व सूचना दिल्या जात आहेत. ‘सचेत’ या प्रणालीवरून लोकांना पाऊस व विजेचे पूर्व सूचना देताना २६ व २७ मे या दोन दिवसांमध्ये नागरिकांना १९ कोटी २२ लाख मोबाईल लघु संदेश पाठविण्यात आले, यातून ५२ पूर्व सूचना देऊन नागरिकांना सतर्क करण्यात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली
राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये २४ ते २६ मे मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बचाव व मदत करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे. या केंद्रात संपर्क साधण्यासाठी २४x७ अधिकारी/कर्मचारी उपलब्ध असल्याचे श्री. खडके यांनी सांगितले.
मदत व बचाव कार्यासाठी पथके
राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर येथे दोन आणि धुळे येथे दोन अशा एकूण चार पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. अतिवृष्टी मध्ये बाधितांना नांदेड येथे तैनात करण्यात येणारी पथके ही धुळे येथून रवाना झाली आहेत. गडचिरोली येथे तैनात करण्यात येणारी पथके ही नागपूर येथून रवाना होत आहेत. यासह राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या देखील प्रवण ठिकाणांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील मुंबई शहर, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड व मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जास्त फटका बसला. मुंबई शहर आणि उपनगर हार्बर लोकल वाहतूक रेल्वे रुळावर पाणी साचल्याने काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे फायबर ऑप्टिक्स केबल कट झाल्याने काही ठिकाणी मोबाईल टॉवर यंत्रणा विस्कळीत झाली होती, ती तत्काळ समन्वयाने पूर्वस्थितीत येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालवधीत दौंडमध्ये सर्वात जास्त ११७ मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये १०४.७५ मिमी आणि इंदापूरमध्ये ६३.२५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. बारामतीमध्ये २५ घरांची अंशत पडझड झाली आहे.
पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
पुणे जिल्ह्यातील मौजे काटेवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या सात लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बारामती तालुक्यातून ७०-८० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. पूर परिस्थिती पाहता एनडीआरएफ ची दोन पथके पाठविण्यात आली. तर इंदापूर येथे पूर परिस्थितीत अडकलेल्या दोन व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
सातारा जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालावधीत फलटण १६३.५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. फलटण तालुक्यातील दुधेबावी या गावाशेजारी ३० नागरिक दहिवडी फलटण रस्त्यावर पूर आल्याने अडकले होते. त्यांना तहसीलदार फलटण यांच्या समन्वयाने तेथील गावात राहण्या व खाण्याची सुविधा पुरविण्यात आली. पूर परिस्थिती पाहता एनडीआरएफचे एक पथक बारामतीवरून फलटणसाठी रात्री रवाना करण्यात आले. या पथकाद्वारा फलटण येथील पूर परिस्थितीची निगराणीचे काम करण्यात आले. सर्व रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली असून, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यात दिनांक २४ ते २५ मे २०२५ या कालवधीत ६७.७५ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. कालव्याचे पाणी ओढ्यात नाल्यात मोठ्या प्रमाणात आल्याने अतिवृष्टीमुळे निरा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यात कुरुबावी गावालगत नदी पात्रात सहा नागरिक अडकले असता इंदापूर येथील एनडीआरएफ चे पथक रवाना करण्यात आले. या पथकाच्या मदतीने सर्व नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर परिसरात भीमा नदी पत्रात तीन नागरिक अडकले होते त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
२४ ते २६ मे या कालावधीत अतिवृष्टीमध्ये राज्यात वीज पडून, भिंत कोसळून, झाड पडून, पाण्यात बुडून आठ व्यक्ती मृत तसेच दोन जखमी झाल्या आहेत. मृतांमध्ये रायगड जिल्ह्यात एक, पुणे जिल्ह्यातील तीन, जालना जिल्ह्यात दोन, अहिल्यानगर जिल्ह्यात एक आणि मुंबई शहरमध्ये एक नागरिकाचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात दोन नागरिक जखमी झाले आहेत. तर लातूर जिल्ह्यात चार प्राणी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक, जालना जिल्ह्यात दोन, नाशिक जिल्ह्यात एक असे आठ प्राणी मृत झाले आहेत. जालना जिल्ह्यात एक प्राणी जखमी झाला असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १५ दिवस अगोदर झालेले आहे. सिंधदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन दि. २५ मे रोजी झालेले असून मुंबई मध्ये दि. २६ मे रोजी दाखल झालेला आहे. दरवर्षी मान्सूनचे आगमन ११ जून ला होत असते. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देताना अरबी समुद्रावर कमी दाबाचा २२ मे रोजी निर्माण झाला होता. त्याचे परिवर्तन पुढील दोन तीन दिवसात चक्रीवादळात होण्याची शक्यता होती. परंतु सदरचे परिवर्तन कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचा परिणाम हा रत्नागिरीच्या ४० कि.मी. उत्तरेला आणि दापोलीच्या दक्षिणेला झाला. यामुळे २४ ते २७ मे दरम्यान रेड अलर्ट असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट, कोल्हापूर घाट, ठाणे, पुणे, रायगड, सातारा, मुंबई, चंद्रपूर व गडचिरोली याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अतिवृष्टी झाली. तसेच ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हतील रायगड, पुणे घाट, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली ठाणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशीव अनेक ठिकाणी पूरस्थिती व अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.
00000
एकनाथ पोवार/विसंअ/