‘बलरामपूर बायोयुग’ जैविक युगाकडे एक पाऊल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 27 : वातावरण बदलाच्या समस्येमुळे आज पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर “बायोयुग” हा पर्याय असून यातील पीएलए (पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड) हे पर्यावरण रक्षणासाठी चांगला पर्याय असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जियो कन्व्हेशन सेंटर येथे “बलरामपूर बायोयुग” या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंग, प्रतिनिधी डॉ.ओमकार शर्मा, ‘बलरामपूर बायोयुग’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विवेक सरोगी तसेच ‘एमएसएमई’चे सदस्य उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांनीच प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. आता पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड हे बायोडिग्रेडेबल पर्याय म्हणून आपल्यासाठी आशादायक आहे. त्याचबरोबर पॉली लॅक्टिक अ‍ॅसिड तंत्रज्ञान साखर उद्योगाला शाश्वत आणि पर्यावरणपूरक ठरु शकते.

साखर उद्योगाच्या समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडून निर्यात कोटा दिला जातो, उत्तर प्रदेशला सुद्धा कोटा दिला जातो, पण तिथे पोर्ट नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील सहकार्याने यासंदर्भातील विषय मार्गी लावले जातील. महाराष्ट्रात अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशातील या क्षेत्रातील उद्योजकांना महाराष्ट्रात उद्योग उभारणीचे आवाहन करित आमंत्रित केले.

000

संजय ओरके/विसंअ/