मुंबई, दि. 28 : कुटुंबातील आपला जीवाभावाचा माणूस निघून गेल्यानंतर, ज्या कुटुंबांनी सामाजिक भान जागृत ठेवून अवयवदान करण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात नवीन ज्योत प्रज्वलित झाली असून, नव्याने जीवनदान मिळाले आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
मुंबईतील सायन रुग्णालयातील झेड.टी.सी.सी. (ZTCC) या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णालयात अवयवदान केलेल्या कुटुंबातील सदस्यांचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला झेड.टी.सी.सी.चे अध्यक्ष डॉ.एस.के.माथूर, न्यायमूर्ती संदीप शिंदे, आरोग्य संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, मुंबईतील खासगी व शासकीय रुग्णालयातील तज्ज्ञ उपस्थित होते.
मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, समाजात अवयवदानाबद्दल असलेले गैरसमज, अकारण भीती, सामाजिक रूढी, चालीरिती या बाजूला ठेवून वेळ प्रसंगी सामाजिक विरोध पत्करून आपण विज्ञानवादाकडे जाणारा अवयवदानाचा विवेकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण समाजाचे आयडॉल बनला आहात. अलीकडच्या काळात अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हजारो रुग्ण किडनी, लिव्हर, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असतात. पण प्रत्यक्षात अवयवदानाचं प्रमाण अल्प आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी समाजात जागृती आणि विश्वास निर्माण करणे, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.
आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात कोल्हापूर, सोलापूर, अमरावती आणि नाशिक येथे नव्या झेड.टी.सी.सी. केंद्रांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. झेडसीसीची टीम, संलग्न रुग्णालये, आरोग्य विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. हे काम एक मिशन म्हणून हाती घेणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयाने केवळ सहभाग नव्हे, तर पुढाकार घ्यावा, योग्य समुपदेशनाद्वारे कुटुंबीयांमधील भीती, अंधश्रद्धा दूर करावी, ग्रामीण भागात जागरूकतेसाठी विशेष मोहिमा राबवाव्यात. हे संपूर्ण कार्य ही केवळ वैद्यकीय बाब नाही, तर ही मानवतेची, आणि सामाजिक बदलाची चळवळ आहे, असेही मंत्री श्री. आबिटकर यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य अवयवदानाच्या क्षेत्रात देशात आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
झेड.टी.सी.सी. चे सेक्रेटरी भरत शहा यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. आबिटकर यांचे स्वागत केले व अवयवदान कार्ड काढण्याचे आवाहन केले. अवयव प्रत्यारोपणाच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या अपोलो, ब्रिच कँडी, क्रिटीकेअर एशिया, हिरानंदानी, फोर्टीस, एशियन रिलायंस, ग्लोबल, जसलोक, ज्यूपिटर, लिलावती, के.ई.एम. अंबानी, जी.एस.सी, कोकिलाबेन इत्यादी रुग्णालयातील प्रतिनिधींचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
000
संजय ओरके/विसंअ/