मुंबई, दि. 28 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे. याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सह सचिव वी. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदींसह अधिकारी उपस्थित होते.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅच्युइटी
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्ती नंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता निकष ठरविण्यात येणार आहेत. अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.
यामध्ये घरपोच आहार, वृद्धी संनियंत्रण क्षमता, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आहार आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरविण्यात आले आहेत.
000
श्रद्धा मेश्राम/विसंअ/