जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा पदवी प्रदान समारंभ

मुंबई, दि. २८ : “जनसंख्या विज्ञान, लोकशाही आणि सांस्कृतिक विविधता हे नवभारताचे आत्मिक स्तंभ आहेत. या त्रिसूत्रीचा अभ्यास आणि तिचे संरक्षण ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (IIPS) ६५व्या आणि ६६व्या पदवी प्रदान समारंभात केले.

या समारंभात उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायन व खत मंत्रालय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार सना मलिक, संस्थेचे संचालक प्रो.डी.ए.नागदेवे आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, “ही केवळ पदवी मिळविण्याची वेळ नाही, तर नवभारत घडवण्याच्या जबाबदारीची सुरुवात आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपली लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि विविधता हे घटक भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे दिशादर्शक आहेत.”

डेटा म्हणजे देशाचा दिशा-निर्देश

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आधुनिक भारतात लोकसंख्याशास्त्र हे केवळ आकडेवारी नाही, तर ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे. बेरोजगारी, आरोग्य सेवांतील असमानता, आणि प्रादेशिक असंतुलन या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य डेटाचा उपयोग अत्यावश्यक आहे. जनसंख्याशास्त्राचे विद्यार्थी, हे बदल घडवू शकता.”

“सरकारने आगामी जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल,” ‘IIPS’ सारख्या संस्थांना या डेटाचे विश्लेषण करून सर्वसमावेशक धोरणं तयार करण्यासाठी महत्वाचे योगदान देण्याचे आवाहन श्री. धनखड यांनी केले.

लोकशाहीसमोरील आव्हाने

धर्मांतरण आणि अनियंत्रित बेकायदेशीर स्थलांतर हे केवळ सामाजिक प्रश्न नाहीत, तर ही आपल्या लोकशाही आणि अस्तित्वासमोरील गंभीर आव्हाने आहेत. आपली सीमा सुरक्षित ठेवणे, सामाजिक समरसता जपणे आणि सार्वजनिक संवादात प्रामाणिकपणा राखणे हे सर्व एकत्रितपणे लोकशाही टिकवतात.

“शांती ही सहिष्णुतेने मिळते, पण तिचे रक्षण शक्तीनेच करता येते. भारताच्या सैन्यदलांनी दाखवलेली रणनीती आणि हे त्याचे उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.

“तुमचे शिक्षण केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाज बदलण्यासाठी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात तुम्ही केवळ आकड्यांमध्ये अडकून न पडता, त्या आकड्यांमागची माणसे समजून घेऊन काम करा. आकडे धोरण ठरवतात, पण लोकच देश घडवतात” असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

 

जनसांख्यिकीय अभ्यास धोरणनियोजनासाठी अत्यावश्यक – केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल म्हणाल्या, तुम्ही देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहात,” जनसांख्यिकीय अभ्यास धोरणनियोजनासाठी अत्यावश्यक आहे. लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता नवभारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. “भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्यामुळे लोकसंख्याविषयक संशोधन ही राष्ट्रीय गरज आहे,” सखोल जनसांख्यिकीय विश्लेषणावर भर देण्यात यावा.

हा कार्यक्रम केवळ एक शैक्षणिक समारंभ न राहता, राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरल्याबद्दल ‘IIPS’ मधील नवपदवीधरांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी उपराष्ट्रपती श्री.धनखड, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पटेल, मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते स्नातक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

000

संजय ओरके/विसंअ/