मुंबई, दि. 28 : भारत आणि श्रीलंका दरम्यान असलेले परस्पर सौहार्द आणि व्यापारविषयक संबंध वृद्धिंगत करण्यावर महाराष्ट्राचा भर असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि श्रीलंका दरम्यान द्विपक्षीय व्यापारातील अधिक संधी आणि शक्यता पडताळण्यासंदर्भात सह्यादी अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी श्रीलंकाच्या महावाणिज्यदूत शिरानी अरियारत्ने आणि शिष्टमंडळाचे स्वागत केले. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. या प्रगतीत महाराष्ट्राचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. भारताच्या एकूण जीडीपीपैकी महाराष्ट्राचे योगदान सुमारे 15 टक्के आहे. मागील दशकात भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकींपैकी 30 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. निर्यातीमध्ये देखील राज्य आघाडीवर असून श्रीलंका आणि भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र आणि श्रीलंकामधील व्यापाराच्या संधींच्या अनुषंगाने यावेळी महाराष्ट्र आणि श्रीलंकाच्या वतीने सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. श्री. रावल यांनी महाराष्ट्र विविध क्षेत्रात करीत असलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून विविध फळांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. व्यापार वृद्धीच्या संधींसाठी श्रीलंकाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्रात भेट देण्याचे निमंत्रण देऊन या बैठकीतील चर्चा फलदायी ठरेल, असा विश्वास श्री.रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
०००००
बी.सी.झंवर/विसंअ/