मुंबई, दि. २ : पोहरादेवी येथे उभारण्यात येत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे काम प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच श्री क्षेत्र पोहरादेवी येथील म्युझियमचे लोकार्पण झाले असून यासंदर्भात पुढील नियोजन करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री राठोड बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वाशिमचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन तसेच ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राठोड म्हणाले, श्री क्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज लाखो अनुयायांचे आराध्य दैवत आहे. पोहरादेवी येथे उभारण्यात येणारे मंदिर आणि म्युझियम हे भाविकांसाठी आस्था केंद्र बनणार आहे. या कामासाठी आवश्यक निधी वित्त विभागाकडून लवकरच उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करून काम वेगात सुरू ठेवावे. ठेकेदारांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करणे बंधनकारक असून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम करावे. या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
०००
राजू धोत्रे/विसंअ