विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर दि.3 (विमाका): राज्य शासनाच्या 150 दिवस कार्यक्रमा अंतर्गत तसेच प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान, अचूक व पारदर्शक करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर  या विषयावर एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. यावेळी अपर आयुक्त विजससिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, खुशालसिंह परदेशी, एमकेसीएल मराठवाडा विभाग मुख्य मार्गदर्शक बालकिशन बलदावा, विभागीय समन्वयक गजानन कुलथे, जिल्हा समन्वयक निलेश झाल्टे उपस्थित होते.

विभागीय आयुक्त म्हणाले, कार्यालयीन कामकाजात योग्य पदधतीने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविल्यास नागरिकांना सेवा गतीने मिळण्यास मदत होईल. अधिकारी तसेच कर्मचारी यांनी आपल्या कामकाजात एआय तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

एमकेसीएलचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम म्हणाले, कृत्रिम बुध्दीमत्ता हे तंत्रज्ञान वापरुन कार्यालयीन कामकाज कमी वेळात प्रभावीपणे करता येते. दैनंदिन प्रशासकीय कामकाजामध्ये कमी वेळेत प्रभावीपणे काम करण्यासाठी एखादे व्हीजन डॉक्युमेंट सारखे दस्तावेज अवघ्या काही मिनिटात तयार करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर चांगल्याप्रकारे करता येऊ शकते. त्यासाठी काटेकोरपणे त्याच्याकडून काम करुन घेता आले पाहिजे, असेही ते म्हणाले.

श्री कदम यांनी संगणकीय सादरीकरण करतानाच काही प्रात्याक्षिक करुन दाखवून कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुध्दमत्तेचे महत्व प्रभावी असल्याचे सांगितले. चॅट जीपीटी, भाषिनी, डेमो एआय, हेड्रा, ग्रोक एआय, डीप सीक, जनरेटीव्ह एआय आदींचा वापर कार्यालयीन कामकाजामध्ये कसा करायचा त्याबाबत सविस्तर माहिती दिली. मजकूर टायपिंगसाठी गुगल डॉक्स, गुगल लेन्स, शुध्दलेखनाच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामरली, त्याचबरोबर संगणकीय सादरीकरणासाठी एआय पीपीटी, प्रेझेटेंशन.एआय, आर्ट वर्कसाठी कॅनवा ॲप याबाबतची माहिती दिली.

कार्यशाळेदरम्यान सहभागी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तांत्रिक साधनांचा वापर करून पाहिला. ई-मेल लेखन, नोंदी ठेवणे, दस्तऐवजांची मांडणी, भाषांतर व अहवाल लेखन यासाठी एआयचा प्रभावी वापर कसा करता येतो याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

यावेळी अपर आयुक्त विजयसिंह देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात एआय तंत्राचा वापर वाढविण्यासाठी एक टिम तयार करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वार्चा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आभार तहसीलदार अरूण पावडे यांनी मानले.

******