विधानसभा लक्षवेधी

मालमत्ता खरेदी-विक्रीवेळी भरले जाणारे मुद्रांक शुल्क स्थानिक विकासासाठी वापरण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 4 : राज्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवेळी भरले जाणारे मुद्रांक शुल्क स्थानिक विकासासाठी वापरण्याबाबत मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य रणधीर सावरकर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य भास्कर जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, सद्यःस्थितीत मालमत्ता नोंदणीदरम्यान वसूल होणाऱ्या मुद्रांक शुल्कातून एक टक्का रक्कम शासनाच्या एकत्रित निधीत जमा केली जाते. ही रक्कम थेट संबंधित महापालिका, नगरपालिका किंवा ग्रामपंचायतींना तत्काळ वितरित व्हावी यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येईल. आगामी अर्थसंकल्पात या प्रलंबित निधीबाबत तरतूद करण्याबाबत वित्तमंत्र्यांकडे मागणी करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेसाठी सज्ज होईल – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ४ :- राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील ईएसआयसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दुरुस्ती व नूतनीकरण काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

या संदर्भात सदस्य मुरजी पटेल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सीमा हिरे, तुकाराम काते यांनी सहभाग घेतला.

या लक्षवेधीच्या उत्तराप्रसंगी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले, या रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य विभाग, राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून  रुग्णालय तातडीने सुरू करण्याबाबत  अधिकाऱ्यानं सूचना दिल्या आहेत.

या हॉस्पिटलमध्ये केवळ ईएसआयसीच नव्हे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मोफत उपचार घेता येईल. तसेच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेत रुग्णांना तपासण्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या.

सदस्य श्रीमती सीमा हिरे यांनी उपस्थित केलेल्या नाशिक येथील हॉस्पिटल मधील सुविधेसाठी पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, असेही आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/ 

अन्न सुरक्षा व तपासणीसाठी यंत्रणा अधिक सक्षम करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, दि. ४ :- राज्य शासनाने अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढ, प्रयोगशाळा सक्षमीकरण, खासगी प्रयोगशाळा सहभागाची प्रक्रिया आणि ई-कॉमर्सवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. यामुळे राज्यातील अन्न सुरक्षेसंबंधी तपासणी यंत्रणा अधिक सक्षम व गतिमान होणार होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत दिली.

या संदर्भात सदस्य श्वेता महाले यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम पाचपुते, प्रवीण दटके, मनोज घोरपडे, कृष्णा खोपडे, रमेश बोरनारे, मुरजी पटेल, नारायण कुचे, अनंत नर आणि श्रीमती मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले, अन्न औषध प्रशासन विभागात नुकतीच भरती करण्यात आली असून १८९ अधिकाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. नियुक्त अधिकाऱ्यांचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे. राज्यात प्रत्येक विभागात एक स्वतंत्र प्रयोगशाळा असावी, असे शासनाचे धोरण असून  प्रयोगशाळा सुविधांमध्ये  वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या  राज्यात तीन प्रयोगशाळा कार्यरत असून, तीन प्रयोगशाळा बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न पदार्थांच्या तपासणीची संख्या वाढावी यासाठी खाजगी प्रयोगशाळांना करारबद्ध करण्यात येणार आहे. यासाठी अन्न तपासणीत खाजगी प्रयोगशाळा सहभागाचा प्रस्ताव  करण्यात आला असून त्यास केंद्र शासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात गुटखा व तत्सम पदार्थाचे विक्रीबाबत पोलीस विभागासोबत तपासणी मोहीम राबविली जाईल. तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आस्थापनाची तपासणी केली जाईल, असे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व तत्सम अन्नपदार्थाचे उत्पादन, विक्री, वितरण, साठा, वाहतूक (महाराष्ट्र राज्यामध्ये व राज्यातून) करणाऱ्या व्यक्ती आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनामार्फत नियमित कारवाई करण्यात येत असल्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले

ऑनलाईन अन्न विक्रीसंदर्भात तक्रारी नोंदवण्यासाठी 1800-1800-365 हा  क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५ या कालावधीत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ५३ प्रकरणांमध्ये ३ कोटी २९ लाख ९६ हजार ३७७ रुपये  इतक्या किंमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकूण दहा वाहनेही जप्त करण्यात आली असून १४ आस्थापना सील करण्यात आल्या असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी दिली

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासासंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. ४ : धाराशिव जिल्ह्यात २२ पवन ऊर्जा कंपन्यांकडून ८४३ पवनस्तंभाचे काम सुरू आहे. या कंपन्यांकडून  स्थानिक शेतकऱ्यांना  होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची  गांभीर्याने दखल घेऊन  या प्रकरणाची पोलिस महानिरीक्षक यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे कृषी राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले.

तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांना कंपन्यांकडून मारहाण प्रकरणावर विधानसभा सदस्य कैलास घाडगे पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, कंपन्यांनी जमीन भाडेपट्टीने घेण्याच्या दस्तामध्ये शेतकऱ्यांच्या बनावट सह्या वापरून खोटी शपथपत्रे सादर केली, काही प्रकरणांत शेतकऱ्यांना खोटे धनादेश देऊन फसवले अशा तक्रारी  प्राप्त झाल्या आहेत. या प्रकाराबाबत पोलीस चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई केली  जाईल. तसेच धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा तसेच सौर ऊर्जा प्रकल्पांशी संबंधित जिल्हास्तरीय समितीकडे ११३ तक्रारी प्राप्त झाल्या असून, उपविभागीय सनियंत्रण समितीकडे २०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारींपैकी २१० तक्रारी निकाली काढल्या असून उर्वरित १०३ तक्रारीवर कार्यवाही सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची लवकरच चौकशी केली जाईल. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही यांची खबरदारी घेतली जाईल. या प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल असेही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी स्पष्ट केले.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनी सहभाग घेतला.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना – राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. 4 : तळेगाव-दाभाडे येथे पिंपरी चिंचवड पोलिसांनी दोन जणांना पिस्तुल व जिवंत काडतुसांसह पकडले. चौकशीनंतर या आरोपींनी लोकप्रतिनिधींना जीवे मारण्याचा कट रचल्याचे समोर आले. याबाबतची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

सदस्य सुनिल शेळके यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) एस.टी. स्टॅण्ड परिसरात दोन आरोपींकडून गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसे बाळगल्याचे आढळल्यामुळे याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर झाल्यावर तडीपार करण्यात आले आहे. हत्यारे पुरवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. प्रकरणाच्या मूळ सूत्रधारांचा लवकरच शोध घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. 4 : अवकाळी पाऊस, वादळी वारा यांमुळे जीर्ण झालेल्या विद्युत पुरवठा तारा यांचे प्रचंड नुकसान होते. यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडतात. राज्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम प्रगतीपथावर असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य निलेश राणे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी सदस्य नमिता मुंदडा, सुनील शेळके, रोहित पवार, स्नेहा दुबे, भास्कर जाधव  यांनी चर्चेत सहभाग घेतला.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून विद्युत यंत्रणांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाते. तसेच, कोकण किनारपट्टीस येणाऱ्या वादळात विद्युत यंत्रणेचे कमीत कमी नुकसान व्हावे व ग्राहकांना अखंडीत वीज पुरवठा व्हावा याकरीता विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. विद्युत यंत्रणेचे सक्षमीकरण करणे यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कामे सुरू आहेत. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत  ६३५ किलोमीटर उच्च दाब भूमिगत केबल टाकण्याचे नियोजन असून, त्यापैकी २२५.८० किलोमीटर काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच १,२२७ किलोमीटर लघु दाब भूमिगत केबल वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे नियोजन असून, त्यातील १०९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत एबी केबलची ४८ किलोमीटरची कामे, ११ के. व्ही. उच्चदाब वाहिनीची १९४.२० किलोमीटरची कामे, लघुदाब वाहिनीची ८१ कि.मी. कामे, भूमिगत केबलची १० कि.मी. कामे पूर्ण झाली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

कोकण भागात वारंवार येणाऱ्या वादळी होणाऱ्या वीजपुरवठ्याचे नुकसानीला प्रतिबंध करण्यासाठी आपत्ती सौम्यीकरण, मदत व पुनर्वसन विभागामार्फतही विशेष उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, कुडाळ व वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाळ्यानंतर भूमिगत वीजवाहिन्यांचे कामे पूर्ण करण्यात येणार आहे. कोकणातील वीज समस्याबाबत अधिवेशनात कालावधीत कोकण विभागातील सर्व आमदारांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ