मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रातील आदिवासी बांधवांच्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, तसेच आदिवासी विकास विभाग व सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, या आदिवासी बांधवांचे अनेक वर्षांपासून सिडकोच्या विकास आराखड्यातील जागांवर वास्तव्यास आहे. या ठिकाणी हे आदिवासी अनेक वर्षांपासून वास्तव्यास असून त्यांच्या पुनर्वसनाकरिता सिडकोमार्फत योग्य धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.तसेच या लोकांचे पुनर्वसन करताना पाणी, वीज, रस्ते, स्वच्छता यांसारख्या सर्व मुलभूत सुविधा पुरविल्या जातील याची काळजी घेण्यात यावी. यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त सहकार्याने सर्वेक्षण करून तीन महिन्यांच्या आत पुनर्वसन आराखडा तयार करण्यात यावा. यासाठी प्रकल्प अधिकारी, पेण हे नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
****
शैलजा पाटील/विसंअ/