मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, ‘हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती’ या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.
ही मुलाखत गुरुवार, दि. १०,जुलै शुक्रवार, दि. ११, शनिवार, दि. १२ आणि सोमवार, दि. १४ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर देखील ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
हवामानाच्या अचूक अंदाजामुळे शेती, पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर विविध क्षेत्रांना अमूल्य मदत होते. या माध्यमातून नागरिकांचे संरक्षण व आर्थिक व्यवस्थापन अधिक सक्षम बनते. प्रादेशिक हवामान विभाग भारतीय हवामान विभागांतर्गत कार्यरत असून, हवामान निरीक्षण, डेटा संकलन, अलर्ट सिस्टीमद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले कार्य करत आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भुते यांनी या अंदाजामागील वैज्ञानिक प्रक्रिया, वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, उपग्रह व रडार यंत्रणा यासंदर्भातील माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/स.सं/