मुंबई, दि. 8 : बीड जिल्ह्यातील परळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात आणखी वीज निर्मिती संच वाढविण्याची बाब तपासली असता ती व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आले आहे. नवीन संच निर्मिती शक्य नसले तरी संच क्रमांक एक ते पाचच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
परळी औष्णिक वीज केंद्राच्या बाबत सदस्य धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य सरोज अहिरे यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील वीजपुरवठा स्वस्त दरात असावा. यासाठी तासागणिक दराच्या आधारे स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यातील वीजपुरवठा स्वस्त दरात मिळावा, यासाठी तासागणिक दराच्या आधारे स्वयंचलित यंत्रणा ‘ मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ कार्यान्वित करण्यात आली आहे. यानुसार स्वस्त असलेली वीज ही ‘ लोड डिस्पॅस सेंटर’ आणि पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) च्या माध्यमातून ऑटोमेटेड प्रक्रियेतून घ्यावी लागते. त्यानुसार बंधने घालण्यात आली असून औष्णिक वीज उत्पादनाचा खर्च जास्त असल्याने नवीन औष्णिक वीज संच उभारणे शक्य नाही.संच क्रमांक ६, ७ व ८ हे सुरु असल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यक्षमतेवर किंवा रोजगारावर कोणताही परिणाम झालेला नाही. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील नवव्या संचाच्या उभारणी संदर्भातील एमओडी (मेरिट ऑर्डर डिस्पॅच) उभारणीसंदर्भातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
000
शैलजा पाटील/विसंअ/