जुन्नर बसस्थानकाचा विकास पीपीपी तत्त्वावर करावा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. 9 : नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी जुन्नर बसस्थानकाचे आधुनिकीकरण सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वावर करण्यात यावे, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

विधान भवन येथे जुन्नर तालुक्यातील जुन्नर, ओतूर व आळेफाटा या बसस्थानकांचा एकत्रित विकास करणे व लातूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार शरद सोनवणे, आमदार अमित देशमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, बसस्थानक शहराच्या विकासाचे एक महत्त्वाचे केंद्र असते. त्यामुळे त्याचे नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास आवश्यक आहे. त्यामुळे बसस्थानकांचा विकास करताना तिकीट बुकिंग सेंटर, प्रवासी प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, उपाहारगृह, चालक-वाहक  आराम कक्ष  तसेच इतर आवश्यक सुविधा असाव्यात. जुन्नर बसस्थानक परिसरात काँक्रीटीकरण व नारायणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी वाहनतळ उभारण्यास प्राधान्य देण्याची सूचना, मंत्री श्री. सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी लातूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे बी.ओ.टी तत्त्वावर विकास करणे तसेच लातूर येथील सर्व एसटी महामंडळाच्या जागांचा एकत्रित विकास करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

मोहिनी राणे/ससं/