जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये जालिंदर नगर जिल्हा परिषदेची शाळा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ९ : इंग्लंडस्थित टी ४ एज्युकेशन संस्थेने आयोजित केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट शाळा या जागतिक पातळीवरील स्पर्धेमध्ये जगभरातल्या प्रगत देशातील व खासगी क्षेत्रातील लाखो शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेचा अंतिम सर्वोत्तम दहा (Top 10) शाळा निवडीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये लोकसहभाग प्रकारात भारतातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे, असे निवेदन विधानसभेत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.
स्पर्धेच्या पुढील व अंतिम टप्प्यांमध्ये या दहा शाळांपैकी जगातील एकच सर्वोत्तम शाळा निवडली जाणार आहे. मात्र त्यासाठी ‘ पब्लिक वोटिंग’ ची अट ठेवण्यात आलेली आहे. ज्या शाळेला सर्वाधिक मतदान मिळेल, ती शाळा जगामध्ये सर्वोत्तम ठरवून विजयी घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेला सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून सन्मानित करण्याकरिता जास्तीत ऑनलाइन मतदान करावे.
जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेचे शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी अभिनंदन करीत जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेला जगात सर्वोत्तम करण्यासाठी आवश्यक मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन पाठबळ देण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यासाठी https://vote.worldsbestschool.org/publicvote25/entry/2649 या लिंकवर जाऊन मतदान करावयाचे आहे. मतदानासाठी ९ जुलै शेवटची मुदत आहे. लिंकवर मतदान केल्यानंतर ईमेलवर जाऊन कन्फर्म वोट करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
००००
निलेश तायडे/विसंअ/