विधानपरिषद प्रश्नोत्तरे

नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासणार नाही – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ११ : पश्चिम विदर्भासाठी महत्त्वाचा असणारा नळगंगा – पैनगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यासाठी आताच्या सर्वेक्षणानुसार ८९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या माध्यमातून १५ तालुक्यांमधील ३ लाख ७२ हजार हेक्टरहून अधिक जमीन सिंचनाखाली येईल. तीन टप्प्यात पूर्ण होणाऱ्या या प्रकल्पासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. त्यानुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री परिणय फुके, प्रवीण दरेकर, संजय खोडके, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, दुष्काळी भागासाठी महत्त्वाचा ठरणारा नळगंगा- पैनगंगा प्रकल्पासाठी केंद्र शासनही मदत करणार आहे. विदर्भातील निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत वर्कआऊट सुरू असून जिगाव, गोसीखुर्द या प्रकल्पांना सुद्धा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर आणि धाम प्रकल्पांसाठी प्रशासकीय मान्यता लवकरच देण्यात येईल. तसेच कोकण विभागातील प्रकल्पांनाही गती देण्यात येईल. महामंडळातील आकृतीबंध अंतिम टप्प्यात असून तो अंतिम झाल्यावर रिक्त पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनच्या पाईपलाईनमुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे फेर सर्वेक्षण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. ११ : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी येथील पॉवर स्टेशनसाठी धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. याबदल्यात शेतकऱ्यांना अतिशय कमी मोबदला मिळाल्याप्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेर चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य सुधाकर आडबाले यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. महाजन बोलत होते. या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, मे. धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ६०० मेगावॅट क्षमतेच्या विद्युत निर्मिती प्रकल्पाकरिता १८.२७ दलघमी इतक्या पाण्याची वर्धा नदीतून वार्षिक उचल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. धारिवाल कंपनीने पाईपलाईन मंजूर मार्गाने न टाकता शेतजमिनीतून टाकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयाकडून चौकशी केल्यानंतर नियमाप्रमाणे पाईपलाईन टाकण्याबाबत तसेच शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तथापि शेतकऱ्यांना देऊ केलेला मोबदला अतिशय कमी दिसून येत असल्याने याचे फेर सर्वेक्षण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेश दिले जातील, असेही मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ११ – लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येते. याचबरोबर धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी तलावांच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत प्रति घनमीटर ३५.७५ रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत दिला जातो. गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाकडील यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

एमएचटीसीईटी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक सामायिक प्रवेश परीक्षा (एमएचटीसीईटी) सुरळीत पार पडावी, यासाठी राज्यातील पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग महाविद्यालयांना संगणक आणि फर्निचर पुरविण्यात आले आहे. त्यामुळे आता एमएचटीसीईटीच्या परीक्षा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये घेतल्या जात आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

राज्यात झालेल्या एमएचटीसीईटीच्या परीक्षेत झालेल्या चुकांसंदर्भात सदस्य अभिजीत वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, यावर्षीची एमएचटीसीईटी परीक्षा २८ सत्रांमध्ये झाली. यातील एकाच केंद्रावरिल इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिकेत २१ प्रकारच्या त्रुटी होत्या. त्यामुळे शासनाने लगेच ५ मे २०२५ परीक्षा घेतली आहे. तथापि, या परीक्षेत झालेल्या त्रुटीसंदर्भात जबाबदार तीन सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा असमाधानकारक वाटल्याने त्यांची सेवा एमएचटीसीइटी या सामायिक प्रवेश परीक्षेच्या गोपनीय कामाकरिता खंडित करण्यात आली असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

एमएचटीसीइटीच्या परीक्षेत चुका होऊ नये यासाठी कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची कमिटी नियुक्त केली आहे. यात प्रश्नसंच तयार करण्याकरिता तज्ज्ञांची नेमणूक करण्याची कार्यपद्धती, प्रश्नसंचानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्याची कार्यपद्धती, अशी मोठी कार्यकक्षा आहे. त्याचबरोबर यापुढे एमएचटीसीइटीच्या परीक्षा राज्याबाहेर होणार नसल्याचेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

संजय ओरके/विसंअ

आदिवासी भागातील शिक्षकांच्या वेतनात होणाऱ्या विलंबावर सुसूत्रता आणणारशालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, दि. ११ : आदिवासी भागातील शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेतन देण्यात होणाऱ्या विलंबावर राज्य शासन गांभीर्याने विचार करत असून लवकरच यामध्ये सुसूत्रता आणण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य किरण सरनाईक आणि भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. भोयर म्हणाले की, आदिवासी भागातील शिक्षकांना वेतन वेळेवर न मिळण्याचे कारण म्हणजे आदिवासी विभागाकडून निधी प्राप्त झाल्यावरच त्या भागातील शाळांचे वेतन देण्यात येते. अनेक वेळा निधीच्या कमतरतेमुळे किंवा उशिरामुळे शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नाही.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना करून, शिक्षकांना दर महिन्याच्या पहिल्या तारखेला किंवा किमान पहिल्या आठवड्यात वेतन मिळेल, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील.

000

संजय ओरके/विसंअ

राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश वितरणात झालेल्या विलंबाची चौकशी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि .११ : पालघर जिल्ह्यातील 1,60,917 विद्यार्थ्यांपैकी 1,41,258 विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले असून, उर्वरित 19 हजार विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाहीत. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, सहकार, खनिकर्म, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.

मंत्री डॉ.भोयर म्हणाले की, सन 2024-25 मध्ये गणवेश वाटपाची पद्धत वेगळी होती. एका गणवेशासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला शिवणकामाची जबाबदारी दिली, तर स्काऊट-गाईडचा दुसरा गणवेश शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी उशीर झाला.

शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सुधारित योजना राबवण्यात येत असून, सर्व शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशासाठी निधी थेट ट्रान्सफर करण्यात आला आहे. या ठिकाणी समितीच स्थानिक स्तरावर कापड खरेदी करून गणवेश तयार करणार असल्याचे मंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले.

यासंदर्भात, विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी अधिवेशन संपायच्या आत बैठक घेऊन संबंधितांवर कार्यवाही करण्याची सूचना राज्यमंत्री डॉ.भोयर यांना दिली.

000000

संजय ओरके/विसंअ/