उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी

कामांच्या आराखड्यात नाविन्यता असावी- उपमुख्यमंत्री

बारामती, दि.१२: तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,  तसेच मंजूर कामांचा आराखडा तयार करताना त्यामध्ये नाविन्यता असावी, याकरिता तज्ज्ञ वास्तूविशारद, अनुभवी व्यक्तींची मदत घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

उपमुख्यमंत्री पवार यांनी तीन हत्ती चौक परिसर, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार निवासस्थान, लेक फ्रंट पार्क येथील पादचारी पुलाचे रेलिंग, फाऊंटन डिझाईन, विव्हींग डेक, उर्दू शाळा बांधकामांची प्लिंथ अंतिम करणे, क्रीडा संकुल तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या कामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

तीन हत्ती चौक परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. शहरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. कालवा परिसरात स्वच्छता राहील, याबाबत दक्षता घ्यावी. नटराज नाट्य कला मंदिरासमोरील परिसरात कमी उंचीची झाडे लावावीत.

लेक फ्रंट पार्क येथील पादचारी पुलाचे कामे करताना पाण्याच्या वहनक्षमतेला अडथळा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. पुलाच्या कामाचा आराखडा करताना ७ मीटर रोड आणि बाजूस ३ मीटर पदपथ याप्रमाणे करावे. त्याचप्रमाणे जड, अवजड वाहनांच्या रहदारीचा विचार करावा. परिसरातील कलाकार कट्ट्याला फलक लावावा.

उर्दू शाळेचा विकास दर्जेदार होण्याकरिता शाळेच्या आराखड्यात शिक्षक, विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा समावेश करावा. तसेच आकर्षक प्रवेशद्वार, वाहनतळ, परिसरातील रस्ते, संरक्षक भिंत, सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता लागणारे मंच, क्रीडांगण आदी बाबी समाविष्ट कराव्यात. आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात. मुस्लीम समाजाला उपयुक्त शादीखान्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.

क्रीडा संकुल परिसरातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी. संकुलात स्वच्छ सूर्यप्रकाश राहील, अशी भितींला रंगरंगोटी करावी. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या आतील पदपथावर पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. दर्शनी भागात नावाचे फलक लावावा. परिसरातील जागेचे सपाटीकरण करून घ्यावे आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करावी,  अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.

०००